yuva MAharashtra व्यथा एका कलाकाराची ! (✒️ राजा सांगलीकर)

व्यथा एका कलाकाराची ! (✒️ राजा सांगलीकर)



| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरु - दि. ५ ऑगस्ट २०२४
तो एक कलाकार. विविध रूपाच्या, आकाराच्या, रंगांच्या कलाकृती बनवणे हा त्याचा छंद. एकदा कां मनावर घेतले की तो कांहीही बनवायचा, कधी एखादी प्रतिमा, तर कधी एखादे चित्र. वेगवेगळ्या रंगाचे मिश्रण करून चित्रामध्ये तो असे कांही रंग भरायचा की पाहणारा थक्क होऊन जायचा. मातीच्या साध्या ढेकळातून उत्कृष्ठ कलाकृती बनवण्यात तर त्याचा हातखंडा आणि दगडाला आपल्या छन्नीने ठोकून असा आकार तो द्यायचा की ते शिल्प पाहणारा त्यापुढे नतमस्तक होऊन जायचा. खूप कष्ट करायचा तो. एखादे काम एकदा कां त्यांने मनावर घेतले की मग त्याला कोणी अडवू शकत नसे. ते त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण होणारच. त्याच्या कलाकृतींचे एक वैशिष्ट्य होते. कोणी कितीही प्रयत्न केले, कांहीही केले तरी त्याच्या कलाकृतींची प्रतिकृति करणे कुणालाच जमायचे नाही. 

अशा कितीतरी सुंदर कलाकृती करून झाल्यावर एकदा त्याच्या मनांत आले, आता आपण एक असे चित्र रंगवूया की, जे आजवरच्या आपल्या सर्व कलाकृतींमध्ये सर्वोत्कृष्ठ असेल. त्याच्या मनाने एकच ध्यास घेतला ही माझी सर्वोत्कृष्ठ कलाकृती असली पाहिजे. ब्रह्मांड शोधूनही या सम किंवा याहून उत्कृष्ठ दुसरे कांहीही असणार नाही. बस्स.  

सर्वोत्कृष्ठ कलाकृती, एक सुंदर चित्र चितारायचे त्याचे काम सुरू झाले. एका मोठ्या कॅनव्हासवर निळ्या रंगाने आकाश रंगवताना त्याच रंगाचे प्रतिबिंब असलेला तसाच अथांग समुद्र त्यांने रंगवला. चंद्र, सूर्य, चांदण्या तर त्यांने अशा रंगवल्या की कॅनव्हासच्या एका टोकाने पाहिले की रात्री उगवणारा, शितल प्रकाश देणारा चंद्र, चमचमणा-या चांदण्या दिसायच्या आणि कॅनव्हासच्या दुस-या टोकाने पाहिले की त्याच जागी आपल्या हजारो किरणांनी आकाश उजळवून टाकणारा सूर्य दिसायचा. क्षणाक्षणाला त्याला कल्पना सुचायच्या आणि लगेचच तो ती आपल्या कॅनव्हासवर उतरायचा. 


सपाट जमीन, उंचच उंच गिरी शिखरे, खोल खोल पसरलेल्या द-या, निष्पर्ण वाळवंट, हिरवागार गालिचा, विविध रंगाची फुले, फुलावर नृत्य करणारी अनेक रंगांच्या मिश्रणातून तयार झालेली सुंदर फुलपांखरे, लहान वेली, झुडपे, विशाल वृक्ष, घनदाट जंगले, या झाडावरून त्या झाडावर हवेमध्ये विहार करणारी छोटे सुंदर पक्षी, भव्य पंखाचे आकाशाला गवसणी घालणारे पक्षी, सुंदर नक्षीची पाठ असलेले किटक, हत्तीसारखे प्रचंड प्राणी, डोक्यावर दहाचा आकडा डौलाने वागवणारा नागराज, आपल्या मजबुत पायाने वा-याशी शर्यत करत दौडणारा पिवळ्या कातडीवर काळ्या ठिपक्यांचा चित्ता, रूबाबदार वाघ, सिंह, आपल्या शेपटावरील निळ्या, रूपेरी, मोतीया रंगाच्या हजारो डोळ्यांचा पिसारा फुलवुन नाचणारे मोर, पाण्याच्या लहान ओहोळापासून ते पाण्याने दुथडी भरून वाहणा-या लांबचलांब नद्या.... विविधता, अमाप सौंदर्य त्यांने आपल्या कॅनव्हासवर रंगवले.   

पण ... पण त्याचे समाधान होईना. हे चित्र सुंदर आहे, त्यात विविधता आहे पण अजूनही यामध्ये कांहीतरी कमी आहे, कशाची तरी कमतरता आहे. सुंदर चित्रे रंगवणारा तो चित्रकार, मातीला उत्कृष्ठ रूप देणारा तो कुंभार, दगडाला गाणे गायला लावणारा तो शिल्पकार, आणि काष्ठातून विविध वस्तु करणारा तो काष्ठकार विचारात पडला. खरं तर आपल्या इतर कलाकृती तयार करतांना त्याला फुरसत कशी ती मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांने आपले इतर सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले आणि या सर्वोत्कृष्ठ चित्रातील कमी कशाने भरून काढता येईल यावर तो विचार करू लागला.

आणि त्याला सुचले, चित्रामध्ये सर्व कांही होते पण त्यात जिवंत माणसे नव्हती. त्यांने लगेच आपला कुंचला उचलला. काळी, सावळी, गोरी, पिवळी, लाल, गुलाबी, पांढुरकी, उंच, बुटकी, जाड, कृश, वेगवेगळा चेहरापट्टी असलेले स्त्री-पुरूष कॅनव्हासवर वेगवेगळ्या ठिकाणी रंगविले. चित्र जिवंत झाले. हातातील कुंचला खाली ठेऊन आपल्या सर्वोत्कृष्ठ चित्राकडे, कलाकृतीकडे त्यांने पाहिले, तो आनंदी झाला, समाधान पावला. 

आपल्या या सुंदर, सर्वोत्कृष्ठ कलाकृतीबद्दल त्याला ममत्व निर्माण झाले. आपण रंगवलेल्या चित्राकडे अखंडपणे पाहत बसण्याच्या त्याला छंदच लागला. असा बराच काळ गेला आणि ..... एके क्षणी त्याला उमगले. त्यांने न रंगवलेल्या छटा, रंग, रेषा चित्रामध्ये उमटत असून चित्राचा समतोल बिघडवत आहेत. त्याच्या सौंदर्याला बाधा आणत आहेत. या गोष्टीचा छडा लावण्याचे त्यांने ठरविले. तो कलाकार आपल्या सुंदर, सर्वोत्कृष्ठ कलाकृतीकडे लक्षपुर्वक पाहु लागला आणि त्याला धक्काच बसला. 

सुंदरतेला बिघडवणारे नीच, दुष्ट, तिरस्करणीय, अधम, बीभत्स, गलिच्छ कृत्य त्यांने चित्रातील सौंदर्याची परिपूर्ती करण्यासाठी चितरालेली ती जिवंत माणसे करत आहेत. कातडीचा रंग, पेहराव, चेह-याची ठेवण या सारख्या गोष्टीवरून त्यांनी आपापसात भेद निर्माण केला आहे. सर्व चित्रभर सीमा नांवाच्या काल्पनिक रेषा मारून संपूर्ण कॅनव्हासची विभागणी खंड, देश, प्रांत, शहर, खेडी यात केली आहे. चित्रातील जास्तीत जास्त रंग, देखावे आपल्या अधिकारात असावेत, कॅनव्हासचा जास्तीत जास्त भाग आपल्या कब्ज्यात असावा या स्वार्थी हेतुने मूळ चित्रात नसलेले धर्म, वर्ण, जात, श्रीमंत, गरीब अशा विचारांचे रंग चित्रात बेमालूमपणे मिसळले जात आहेत. आणि आपल्या या टोकाच्या स्वार्थाच्या परिणामी आपापसामध्ये भांडून, लढाया करून, युद्धे करून चित्रातील ओहोळातील, नद्यातील पाण्याचा मूळ निर्मळ रंग बदलून लालभडक करून टाकला आहे.

आपल्या सुंदर, सर्वोत्कृष्ठ निर्मीतीच्या वाताहातीने त्या कलाकाराचे मन खिन्न झाले आणि निराश होऊन त्यापासून तो कायमचे दूर जाऊन बसला.
 
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण...