| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ ऑगस्ट २०२४
वासनांध नराधमांनी राज्यातील अनेक ठिकाणी महिला व आमच्या बहुजनांच्या लेकीवर अत्याचार केले. कायम माता आणि माणुसकीच्या रक्षणार्थ धावून जाणारे पृथ्वीराजबाबा पाटील आणि फौंडेशनला हा फार मोठा धक्का बसला आहे. आम्ही अशा दुर्दैवी घटनांचा जाहीर निषेध करतो. सांगलीत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करुन नराधम आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. सांगलीच्या आमच्या लेकी या रणरागिणी आहेत. संकटात निर्भयपणे हल्ला परतवण्यासाठी सक्षम झाल्या पाहिजेत, असे प्रतिपादन विजया पृथ्वीराज पाटील यांनी केले.
सांगलीतील एकही महिला आणि आमच्या मुलींकडे वाकड्या नजरेने कोणी पहाणार नाही यासाठी नागरिकांनीही पुढे आलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून सौ पाटील म्हणाल्या की लैंगिक अत्याचार होत असताना केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. संजयनगर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती घेऊन पिडीत कुटुंबाला त्यांनी भेटून धीर दिला आणि परिसरातील महिला व नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.
पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजया पाटील यांनी संजयनगर भागात भेट देऊन पिडीतांना धीर दिला. यावेळी त्यांनी फौंडेशनकडून आर्थिक मदतही दिली. पृथ्वीराजबाबा पाटील व विजयाताईंनी अत्याचाराविरुद्ध लढण्याची उर्जा दिली असून आर्थिक हातभारही लावला आहे. आम्हाला त्यांच्या या मानवतावादी कार्यातून आईच्या वात्सल्याची अनुभूती लाभली असे सांगितले.
यावेळी सरीता शेख, सुजाता पाटील, विक्रम शिंदे, खंडोबा मंदिराचे अध्यक्ष पापू भोसले, हनुमान मंदिराचे अध्यक्ष कृष्णा कांबळे व भागातील महिला उपस्थित होत्या.