| सांगली समाचार वृत्त |
देगलूर - दि. ३० ऑगस्ट २०२४
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून मधील महाआघाडीमध्ये मोठा भाऊ बनल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला स्ट्राईक रेटच्या आधारे सर्वाधिक जागा देण्याची मागणी राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वरिष्ठ नेत्याकडे केली आहे.
अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसतानाच महाआघाडीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याला कारण ठरले आहेत ते देगलूर विधानसभेचे विद्यमान काँग्रेस आमदार श्री. जितेश अंतापुरकर. ते माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच भाजपावासी झालेले अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अशोक चव्हाण भाजपा मध्ये गेल्यानंतर ते अस्वस्थ होते. चव्हाण यांच्यासोबतच त्यांना भाजपामध्ये जायचे होते. परंतु पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कारवाईचा बडगा उगारला गेला असता, त्यामुळे देगलूरकर यांनी आस्तेकदम चालण्याचा निर्णय घेतला होता.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे काँग्रेस नेते जितेश अंतापुरकर यांची समजूत घालून, त्यांचा भाजप प्रवेश रोखतात, की त्यांच्यावर पक्ष सोडण्यापूर्वीच कारवाईचा बडगा उभारतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.