| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २७ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे 27 ऑगस्ट रोजी पुकारलेला एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती कृती समितीतर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. राज्यस्तरीय कृती समितीच्या बंदचे व्याप्ती लक्षात घेऊन राज्य सरकारतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री शासकीय अतिथी ग्रह येथे उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कौशल्य विकास मंत्री ना. मंगलप्रभात लोढा, आमदार श्रीमती माधुरीताई मिसाळ, तसेच पणन, वित्त, सहकार, नगर विकास विभागाचे मुख्य सचिव, पणन संचालक व विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले. कृती समितीचे समन्वयक श्री. राजेंद्र बातम्या व दि पुन्हा मर्चंट चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी बाजार समितीच्या विविध प्रश्नांची माहिती दिली. त्यांचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांनी जीएसटी संदर्भातील प्रश्न मांडले. यावेळी मोहन गुरनानी, दिपेन अग्रवाल व भीमजी भानुशाली यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सुमारे दोन तास झालेल्या या बैठकीमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रश्न समजावून घेतले व बाजार समिती विषयासाठी तसेच जीएसटी व अन्य विषयासाठी कृती समिती सदस्य मुख्य सचिव व उच्च अधिकारी वर्गाची त्रिसदस्य समिती स्थापन करण्यात आली. सदर समितीने 30 दिवसांमध्ये योग्य ते निर्णय घेण्यास चे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
दरम्यान या बैठकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी ललित गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली व व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक असल्याची ग्वाही दिली व बंद मागे घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी एलबीटी कायदा 2015 साली रद्द होऊनही अद्याप याबाबत व्यापाऱ्यांना नोटीस येत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्यातील सर्व महानगरपालिका मधील एलबीटी विभाग बंद करण्याची मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. त्याला त्यांनी स्वीकृती देऊन अधिकाऱ्यांना यासंबंधी आदेश काढण्याचे निर्देश दिले.
उद्योग मंत्री उदय सामंत, नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यापाऱ्यांची भूमिका सरकारकडे प्रभावीपणे मांडण्यासाठी विशेष पुढाकार घेऊन बैठक आयोजनामध्ये सहभाग घेतला. याबाबत कृती समितीने चर्चा करून 27 तारखेचा एक दिवसीय राज्यव्यापी बंद तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, फॅमचे सचिव प्रितेश शहा, ग्रोमाचे सचिव नितेश वीरा, पुन्हा मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबोले, अनिल भन्साली उपस्थित होते. शेवटी गृहाचे अध्यक्ष भीमजी भानुशाली यांनी आभार मानले.