yuva MAharashtra निमित्त साबुदाना वडा खायचे पण शिकवण आयुष्याची ! (✒️ राजा सांगलीकर)

निमित्त साबुदाना वडा खायचे पण शिकवण आयुष्याची ! (✒️ राजा सांगलीकर)



| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. २७ ऑगस्ट २०२४
माझ्या घरापासून दोन गल्ल्या सोडून पुढे असलेल्या विठोबाच्या देवळात भरणा-या शाळेत मी चवथीपर्यंत शिकलो. त्यानंतर पाचवी ते सातवी पर्यंतचे माझे शिक्षण घरापासून खूप लांब हरभट रोडवर असलेल्या ‘नूतन मराठी विद्यामंदिर’ या शाळेत झाले. सातवी इयत्ता उत्तीर्ण होऊन वयाच्या १२-१३ व्या वर्षी चड्डी सावरत अस्मादिक त्याच शाळेच्या इमारतीत असलेल्या ‘गणपतराव आरवाडे हायस्कूल’मध्ये आठव्या यत्तेत दाखल झाले. आता मला नव्या-नव्या गोष्टींची जाणीव होऊ लागली होती. वयोमानाप्रमाणे माझ्या शरीरामध्ये व विचारांमध्ये बदल होऊ लागला होता. 

१२−१३ वर्षांचे हे वय; खरं तर जगाचा अनुभव, जीवनाचा अर्थ समजण्याचे नसतेच मुळी. हे वय असते चांगले विचार, आचार, शिस्त, सवयींच्या साठवणीचे. या बाबत मी खूप सुदैवी... आणि त्याचे सर्व श्रेय माझ्या आईला व माझ्या शिक्षकांना जाते. 

माझी आई शाळा शिकलेली नव्हती. पण जीवनाच्या महाविद्यालयातील ती ‘मास्टर’ होती. १२−१३ वर्षांच्या मुलाच्या मानसिकतेचे तिला पुरेपुर ज्ञान होते. माझ्या वागण्यावर, बोलण्यावर तिचे बारकाईने लक्ष असायचे. मी कुठे जातो, काय करतो, कुणाशी मैत्री करतो, कुणाबरोबर खेळतो, अभ्यास, गृहपाठ वेळेत करतो की नाही, अभ्यासात टंगळमंगळ करतो कां ? यावर माझ्या आईची बारीक नजर असे. शिस्तीच्या बाबतीत माझी आई फारच कडक होती. माझ्याकडून कांही चुकले, गैरवर्तणूक झाली तर कधी ती अबोला धरायची, कधी समजावून सांगायची, कधी कडक शब्दांत माझी कानउघडणी करायची तर कधी पाठ मऊ होईपर्यंत माझी धुलाई व्हायची. माझ्यावर चांगले संस्कार होण्यासाठी माझ्या आईने खूप कष्ट उचलले. ज्याचा उपयोग मला माझ्या पुढील आयुष्यात झाला. 


शाळेच्या निमित्ताने मी थोडा जास्त वेळ आईच्या नजरेबाहेर राहू लागलो. पण माझ्या आईचे हेरखाते जबरदस्त होते. घराबाहेरील माझ्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळण्यासाठी तिने शाळेत, बाहेर सगळीकडे सर्वत्र आपले हेर पेरले होते. त्यामुळे तिला माझी आणि माझ्या उद्योगाची, उचापत्यांची इत्थंभूत माहिती मिळायची. आता हसू आणणारे पण त्यावेळी माझी चड्डी ओली करणारे मजेदार प्रसंग कधी-कधी निर्माण व्हायचे. 

एकदा अशीच मजा झाली. त्यावेळी मी ९ वी च्या वर्गात होतो. वर्गातील कांही मुलांशी माझी मैत्री झाली होती. सखाराम हा असाच माझा एक मित्र. सखारामच्या घरची श्रीमंती होती. एके दिवशी सखारामने मला विचारले, 

“राजा, तू कधी साबुदाण्याचा वडा खाल्ला आहेस कां?” 

“मी साबुदाण्याची खिचडी नेहमी खातो, आई देते मला खायला पण वडा नाही कधी खाल्ला.” मी सख्याला सांगितले.  

“तर मग आज दुपारच्या मधल्या सुट्टीत माझ्या बरोबर चल. मी तुला साबुदाण्याचा वडा खायला देतो.” सखारामने सांगितले. 

दुपारी शाळेची मधल्या सुट्टीची घंटा वाजली आणि मी सखारामसोबत साबुदाण्याच्या वड्याची चव पाहण्यासाठी निघालो. वाटेत मी सख्याला विचारले, 

“आपण कुठे चाललोय?” 

“हनुमान हॉटेलमध्ये” सख्याने सांगितले आणि मी मूळापासून हादरलो. 'हॉटेलमध्ये जायचे ? घरी आईला समजले तर ? मेलो ! ठार मेलो ! साबुदाणावड्याच्याऐवजी आईकडून मिळणाऱ्या खरपूस धपाट्यांच्या आठवणींने माझ्या तोंडाची चव पळाली'. मी शाळेकडे परत फिरू लागलो.
 
“अरे कोण बघणार आहे आपल्याला. आपण स्पेशल रुममध्ये बसूया. म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेलो होतो, हे कुणालाही समजणार नाही.” सखारामने मला दिलासा दिला. 

कसाबसा धडधडत्या काळजाने मी सख्याबरोबर हॉटेल हनुमानच्या स्पेशलरुममध्ये घुसलो पण, मी हॉटेलमध्ये गेलो होतो, हे जर आईला समजले तर ? विचाराने माझ्या तोंडचे पाणी पळाले होते. सख्या मात्र निवांत होता. त्यांने रूबाबात दोन प्लेट साबुदाणावड्याची ऑडर दिली. ऑर्डर घेऊन वेटर साबुदाणा वडा आणायला गेला. मी सशाच्या काळजाने कसाबसा बसलो होतो. इतक्यात, स्पेशल रूमवरील पडदा बाजूला झाला आणि .......... 

स्पेशल रूमच्या दारात आमचे पी.टी. चे सर उभे होते. ६ फूटापर्यतची उंची, मूळचा गव्हाळ पण उन्हात करपून काळा पडलेला काळा रंग, धिप्पाड शरीर. हे सर माझ्या घरापासून दोन तीन घरे सोडून पलिकडे असलेल्या एका खोलीत भाडेकरू म्हणून राहात होते. त्यामुळे ते मला, आम्हा सर्वांना चांगले ओळखत होते. 

पी.टी.च्या सरांच्या मागे गोरेपान, सडपातळ अंगकाठीचे गणिताचे सर हॉटेलच्या स्पेशल रूमच्या दारात उभे होते. हे दोघेही सर फार कडक आणि मारकुटे होते. मुलांच्या चड्ड्या ओल्या होईतो पर्यंत छडीने फोकळून काढण्याबद्दल प्रसिद्ध होते. या दोन्ही मारकुट्या सरांना पाहून मी मुळापासून हादरलो, माझ्या घशाला कोरड पडली. 

स्पेशलरूमचा पडदा बाजूला करून पी.टी.चे सर आंत प्रवेश करते झाले आणि स्पेशल रूमची ती संपूर्ण खोली भरून गेली. सरांनी आपला एक हात माझ्या खांद्यावर आणि दुसरा हात टेबलावर ठेवून, मला उभेसुद्धा राहता येऊ नये. अशा पद्धतीने पूर्णपणे जेरबंद करून अत्यंत शांत सुरात विचारले, 
“काय सांगलीकर, आज हॉटेलमध्ये? आईने जेवणाचा डबा दिला नाही वाटते?” झालं...... माझी चड्डी ओली व्हायची वेळ आली. तरीही कसेबसे सरांचे दोन्ही हात मी उचलले आणि स्पेशलरूमच्या बाहेर उडी मारली. बाहेर गणिताचे सर उभेच होते. मी पळून जाताना पाहून ते ओरडले 
“अरे थांब, थांब ...”  

पण मी कसचा थांबतो. हॉटेल हनुमानच्या स्पेशलरूम पासून मी जे सुसाट पळत सुटलो ते थेट शाळेमध्ये येऊनच थांबलो. कसाबसा वर्ग गाठला आणि माझ्या नेहमीच्या जागेवर धाडधाड उडणाऱ्या काळजाने बसलो. पुढचे सर्व चित्र डोळ्यासमोर उभा राहिल्याने मी जाम टरकलो होतो. 

थोड्या वेळाने फक्त नांवात सखा आणि राम असलेला, रावण माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि तुच्छतेने मला म्हणाला, 
“भित्री भागुबाई..... ”. 
इतर वेळ असती तर सख्याची आणि माझी चांगलीच जुंपली असती. पण त्यावेळी मात्र मी कांहीच प्रत्युत्तर न देता गप्प बसलो. दुपारची सुट्टी संपली, वर्ग सुरू झाले. पण माझे लक्ष लागेना. शाळा सुटली. पुढे घडणारे महाभारत आठवत मुद्दाम टंगळमंगळ करत, वेळ काढत, मी घरी निघालो. घराजवळ आलो आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला. ..... पी.टी.च्या सरांची सायकल माझ्या घराबाहेर उभी असलेली मला दिसली. 

मान खाली घालून मी घरात प्रवेश केला. बाहेरच्या खोलीत सर माझ्या आईशी कांहीतरी बोलत होते. मी आलेला पाहून सरांनी आपले बोलणे आवरते घेतले आणि ते निघून गेले. आईने मला सांगितले, 

“राजू, शाळेचे कपडे काढ व हात-पाय धुऊन ये”. त्याप्रमाणे शाळेचे कपडे काढून, हात-पाय धुऊन मी खाली मान घालून आईपुढे येऊन उभा राहिलो.

आईने माझ्या पुढ्यात साबुदाणा वड्याची प्लेट ठेवली आणि म्हणाली, 

“पोटभर खा. हॉटेलमधील अरबट-चरबट, कसल्याही तेलात तळलेले, स्वच्छता न पाळलेले पदार्थ खाणे तब्येतीला चांगले नसते. तूला साबुदाना वडा किंवा असचं कांही खायची इच्छा झाली तर मला सांगायचं बरं का. मी करून देईन तुला.” 

आईचे बोलणे ऐकून माझे डोळे पाण्याने टरटरून भरले हे पाहुन आई मला म्हणाली, 

“आता रडत बसू नकोस. वडे कसे झालेत ते मला सांग. संपले तर आणखी करून देते.”

आज माझी आई या जगात नाही पण तिने जे मला शिकवले ते आजही माझ्याजवळ आहे आणि सदैव असणार आहे.
आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण
टीपाः कथेसाठी मित्राचे व हॉटेलचे नांव बदलले आहे.