Sangli Samachar

The Janshakti News

आणि तो वेडा चालत होता ! (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ७ ऑगस्ट २०२४
मानवी जीवनामध्ये मुक्कामाच्या स्थानापेक्षा वाटचाल करणे हे जास्त महत्वाचे असते आणि जगण्याचा एक पाठ म्हणून हरणे, पराभूत होणे, हे तितकेच निर्णायक आहे जितके की जिंकणे. पण जीवनाची वाटचाल, त्यातील हार-जीतचा चढउतार या मागील संरचना, गुढ समजणे कांही भाग्यवंतांच्या नशीबात असते. या भाग्यवंताना कांही लोक वेडे समजतात. अशाच एका वेड्याची ही कथा.   

सकाळ झाली होती. सूर्याची किरणे बरीच वरती आली होती, पण त्याचे मन अंथरूणातून बाहेर पडायला तयार नव्हते. काय करायचे उठून, नेहमीचेच कंटाळवाणे, निरस जीवन. तेच ते घर, बायको, मुले, वृद्ध आई-वडिल, त्या सगळ्या जबाबदाऱ्या, कटकटी, त्रास. बसायच्या जागेला फोड-मोड फुटेपर्यंत दिवसभर राबराब राबायचे, शरीराला विसावा नाही मनाला क्षणाचीही उसंत नाही. 

ऑफीस, जनावरांचा एखादा कोंडवाडा परवडला. कोंडवाड्यातील जनावरांना किमान खुली हवा तरी मिळते, पण इथे एअरकंडीशन मशीनची कृत्रीम हवा, ते रूक्ष, राजकारणाने, हेवादाव्याने भरलेले त्रासदायक कोंदटलेले वातावरण आणि या सर्वावर कडी बॉसची हुकुमशाही. पण करायचे काय, यातून सुटका कशी होणार? खरं तर, आजच्या घटकेला त्याची अपेक्षा फक्त मनसोक्त झोपण्याची आहे, पण त्याला माहिती आहे, तेही शक्य नाही. तेल घाणीचा कोलू ओढणारा बैल चाकोरी सोडून कधी इतरत्र फिरू शकतो कां? त्याच्या मनात विचार उसळला. यार, कंटाळा आला आहे अशा जीवनाचा. 


जाऊं दे मरूं दे ते ऑफीस, बसुं दे आज बॉसला कोकलत, त्याला जे कांही करायचे आहे ते करूं दे. जास्तीत जास्त काय करेल, बेंचवर बसवेल, इतकेच ना, बसव म्हणाव तुला हवे तितके दिवस, तुझे कुठे व कधी अडते ते चांगले ठाऊक आहे, त्या वेळी दाखवतो इंगा तुला. 

त्यांने डोक्यावर पांघरून ओढून घेतले, पण झोप येईना. मन विचारांने बोजड झाले असले, चंचल असले की झोप कुठे पळुन जाते कुणास ठाऊक. आणि एकदा कां ही बया रूसली की संपले सारे. कांहीही करा, मेंढ्या मोजा, कोष्टक उलटी-सुलटी मोजा, किचकट, न समजणा-या जड भाषेतील पुस्तके वाचा, डोळे मिटून ध्यान करा, गोळ्या खावा, नाहीतर आणखी कांही करा, जेवढे तिच्या मागे लागू तेवढी ती दूर पळते. त्याच्या झोपेची अवस्था तशीच झाली होती. कंटाळून त्याने लाथेने अंगावर ओढलेले पांघरून झटकले आणि तो उठुन उभा राहिला. शौच, दंतमंजन, स्नान आवरले. शर्ट पँटमध्ये कसाबसा कोंबला आणि तो घराच्या बाहेर पडला. 

पण जायचे कुठे, ऑफीसला जायचे नाही हे तर ठरलेले होते. पण बाकी कांहीच ठरलेले नाही. काय करावे? विचारांच्या जंजाळात वावरत तो एका जंगलात पोहचला. जंगलात सगळीकडे लहान-मोठी, खुरटी-भव्य, पानाफुलांनी लगडलेली, फक्त शुष्क फांद्या राहिलेली झाडे, वेली, वृक्ष होते. त्यांच्याकडे पाहात असतांना त्याच्या मनांत विचार आलाः मनुष्यप्राण्यासारखी यांच्यातही सर्वात उंच कोण जातो याची स्पर्धा असेल कां? आपल्या सरहद्दी हे कसे ठरवत असतील व नंतर स्वार्थापोटी एकमेकांच्या तथाकथित सरहद्दीमध्ये आक्रमण करत असतील कां? मोठा मासा लहान माशाला खातो त्याप्रमाणे यांचेही जीवन असेल कां? मनात उठलेल्या विचारांच्या सोबतीने तो जंगलात वाटचाल करू लागला. 

चालत असतांना त्याची दृष्टी आणखी कांही झाडे-वृक्षावर गेली. त्या झाडा-वृक्षांना वेलींनी, बाडंगुळानी असे लपेटलेले, वेढलेले होती की त्या झाडांचे, वृक्षांचे मुळ रूप बिघडून एक वेगळेच बेगडी रूप त्यांना प्राप्त झाले होते. त्याच्या मनांत विचार आला. मनुष्य प्राण्याचेही असेच आहे. जात, पात, धर्म, वंश, वर्ण, यांच्या कुकल्पनांनी एकदा का मनुष्याला लपेटुन, वेढुन टाकले की त्याचे खरे स्वरूप खोट्या भ्रामक स्वरूपात बदलते आणि मग मागे उरतात फक्त बांडगुळे, जीवन रस शोषणारी.    

जंगलातील त्याची वाटचाल पुढे सुरू असता त्याचे लक्ष एका भव्य वृक्षाकडे वेधले गेले. तो वृक्ष खरोखरीच भव्य दिसत होता. उंच, रूंद वाढलेला, त्याची जाड मुळे जमीनीला जखडली होती. त्या वृक्षाबद्दल आकर्षण वाटून तो त्याच्या जवळ जाऊन निरखून पाहु लागला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. लांबून तो वृक्ष भव्य दिसत होता, पण जवळ गेल्यावर त्याला आढळले की त्या वृक्षाला वाळवीने पोखरून इतके कमकुवत केले आहे की कोणत्याही क्षणाला तो कोलमडून जमीनीवर पडेल.

माणसांचेही असेच असते. एकादा का माणसाच्या विचारांना अहंकार, द्वेष, मत्सर, इर्षा, अनैतिकता, स्वार्थ, दुराग्रह, अंधश्रद्धा, अश्रद्धा, कुश्रद्धा, अविचार, अविवेक यांची वाळवी लागली की ती त्याला पोखरते, कमकुवत, दुर्बल बनवते आणि मग तो मनुष्य कितीही मोठा विद्वान असो, शक्तीमान असो, उच्च पदावर असो, नवकोट नारायण असो त्याचा अधःपात होऊन तो धुळीला मिळणार हे निश्चीत.
मनात उठणा-या विचारांच्या लहरी सोबत तो जंगलात वाटचाल करत होता. जंगलामध्ये पुढे-पुढे जात असता कोणत्यातरी पक्ष्याचा आवाज त्याच्या कानी पडला. मान वरती करून त्यांने पाहिले. एका झाडावर एक नर पक्षी व मादी पक्षिण घरट्यातील आपल्या पिलांना अन्न भरवत होती. अन्न संपले की उडुन जात होती, अन्न गोळा करत होती व पिलांच्या चोचीत चोच घालुन त्यांना भरवत होती. 

नकळत त्याच्या मनाने त्याच्या जीवनाची तुलना पक्ष्यांच्या जीवनाशी केली. हंsss त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला. किती सुखी, आनंदी आहे हे पक्ष्यांचे जोडपे, त्यांचे जीवन. निसर्ग नियमाप्रमाणे वंशवृद्धी होण्यासाठी ठराविक ऋतुमध्येच फक्त संभोग करायचा. भूक लागली की अन्नाचा शोध घ्यायचा, अन्न मिळवायचे व भूक असेल तितकेच खायचे, साठा करायचा नाही की उष्टे टाकुन माजायचे नाही. पिल्ले लहान असे पर्यंत त्यांची काळजी घ्यायची, त्यांना अन्न पुरवायचे, स्वतःचे अन्न स्वतः मिळवण्याचे शिक्षण द्यायचे, आपले शत्रु कोण, मित्र कोण यांची माहिती सांगायची, शत्रु पासुन संरक्षण करण्याच्या युक्त्या सांगून उपदेश करायचा. 

एक दिवस पिल्ले स्वतःचे जीवन स्वतः जगण्या इतपत सबळ झाली की आपल्या आई-वडिलांना सोडुन उडुन जातात. पण त्याचे पक्ष्यांना कांहीच वाटत नाही कारण ते जे कांही करत असतात ते निसर्ग नियमाप्रमाणे, निरपेक्ष भावनेने. पक्ष्यांच्या जीवनाबाबत असा विचार करत असतांना त्याला खलील जीब्रानच्या ‘प्रॉफेट’ पुस्तकातील मानवी जीवनाबद्दलची कांही विचार आठवले. Your children are not your children. They are the sons and daughters of Life’s longing for itself. They come through you; but not from you. And though they are with you; yet they belong not to you. You may give them your love; but not your thoughts, for they have their own thoughts. तुमची मुलं तुमची नाहीत. ते जीवनाच्या स्वतःच्या इच्छेचे मुले आणि मुली आहेत. ते तुमच्याद्वारे येतात; पण तुमच्याकडून नाही. आणि ते तुमच्यासोबत असले तरी; तरीही ते आपले नाहीत. तुम्ही त्यांना तुमचे प्रेम देऊ शकता; पण त्याचे विचार नाही, कारण त्याचे स्वतःचे विचार आहेत.

त्याच्या मनात विचार चमकून गेला. या छोट्या-छोट्या पांखरांना, पक्ष्यांना जीवनाचे तत्वज्ञान ख-या अर्थाने समजले आहे. या पशु-पक्ष्यांना ज्यांना आम्ही मानव कमी बुद्धिवान समजतो, ते जीवनाचे तत्वज्ञान ख-या अर्थाने जगत आहेत पण बुद्धिमान मानसाला मात्र हे कां बरे जमत नाही? 
विचारांच्या जाळ्यातील कोष्टी उद्गारला, प्राणी-पक्षी निसर्ग नियमांचे पालन करत वर्तमान काळात जगत असतात, पण मनुष्य निसर्ग नियमांना पायदळी तुडवतो. माणसांचा वर्तमानकाळ, भुतकाळातील विचार-आठवणींनी जखडलेला आणि भविष्यकाळातील चिंतेने ग्रासलेला असतो. त्यामुळे त्यांचे शरीर जरी वर्तमानकाळात असले तरी मन व आत्मा वर्तमानकाळात नसतो, तो त्याच्या हातुन कधीच सुटुन गेलेला असतो. 

माणसाला कधी काळीतरी असे पक्ष्यांप्रमाणे मुक्त जीवन जगता येईल कां? विशाल आकाशात मुक्त विचारांनी भरारी मारता येईल कां ?वर्तमानकाळात आणि फक्त वर्तमानकाळातच वावरता येईल कां? त्याच्या मनात उठलेल्या प्रश्नांची उत्तरे खरं तर त्याला माहीती होती पण ....
अशा प्रकारे जंगलातील काट्याकुट्यांनी, कुसळांनी, किटक, जळवांनी भरलेली वाट चालत, वाटेत आलेली दृश्ये पाहात, अनुभवत तो मार्गक्रमण करत होता. वाटेत असलेल्या काट्यांना टाळण्याचा तो शक्यतो प्रयत्न करायचा पण तरीही कांही छुपे काटे त्याच्या पायात घुसायचे. त्यांना तो कधी हळुवारपणे बाहेर काढायचा तर कधी खस्सकन उपसुन फेकुन द्यायचा. पण कुसळे मात्र त्याला चिकटायचीच, कांही क्षणांसाठी क्षोभ निर्माण करायची व कालांतराने विरून जायची. जळवांचे मात्र तसे नसायचे. एकदा कां त्या चिकटल्या की त्यांचे पोट भरेपर्यंत त्या रक्त पीत राहायच्या आणि रक्त पिऊन पोट भरल्यावरच त्या आपोआप गळुन पडायच्या. 

अशा बिकट स्थितीत जंगलात वाटचाल करतांना त्याला थकवा जाणवु लागला. विश्रांतीची गरज भासू लागली, पण कांही क्षण विसावा घ्यावा असे ठिकाण नजरेला न आल्याने पाय ओढत, कसाबसा तो वाटचाल करत राहिला. उद्विग्न अवस्थेत जंगलातील एका तळ्यापाशी तो येऊन पोहचला. तळ्याच्या पाण्यावरून येणा-या मंद, शीत वाऱ्याच्या झुळकीने त्याचा थकवा कमी झाला, त्याला बरे वाटले. इथे कांही वेळ विश्रांती घ्यावी असा विचार करून तो तळ्याच्या काठावर बसला. 

तळ्याच्या काठावर बसल्यावर त्याचे लक्ष सहजच तळ्यातील पाण्याकडे गेले. काठा जवळच्या पाण्यात पंखाची एक मुंगी उताणी पडली होती. त्याला वाटले आली असेल वाहत किंवा मेलीही असेल. तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे त्यांने ठरवले. पण माणसांच्या मनांचे एक वैशिष्ट आहेः एखाद्या गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे दुर्लक्ष करायचे त्यांने ठरवले की त्याचे मन त्याला फिरून-फिरून त्याचीच आठवण करून देते आणि त्याला अस्वस्थ, बेचैन, चंचल करून सोडते. 

त्याच्या मनाचेही तसेच झाले. वारंवार त्याचे लक्ष त्या मुंगीकडे वेधले जाऊ लागले. ती मुंगी जीवंत असेल तर तिला पाण्याबाहेर काढायचा त्यांने विचार केला. आपल्या हाताची तर्जनी त्यांने मुंगीच्या जवळ पाण्यात बुडवली. मुंगी जीवंत होती. पाण्यामध्ये उठलेल्या सुक्ष्म लहरींची तिला जाणीव झाली. आपल्या शरीराची तिने किंचीत हालचाल केली. जवळ आलेला आधार माणसाचा आहे हे तिच्या घ्राणेंद्रीयांनी तिला सांगितले. पण माणूस म्हणजे धोका हे मुंगीला माहिती होते. जवळ आलेला माणसाच्या हाताचा आधार तिने नाकारला व पाण्यामध्ये ती तशीच उताणी पडुन राहिली. 

आपल्या बोटावर मुंगी चढत नाही हे पाहुन त्यांने तळ्याच्या काठावर जवळ पडलेले झाडाचे वाळलेले उचलेले व मुंगीच्या जवळ ठेवले. मुंगीला पाण्यामध्ये उठलेल्या सुक्ष्म लहरींची पुन्हा एकवेळ जाणीव झाली. आपल्या शरीराची तिने किंचीत हालचाल केली. जवळ आलेला आधार झाडाच्या पानाचा आहे हे तिला समजले. आपल्या स्वतःभोवती ती वेगाने गोलगोल फिरू लागली. मुंगीची ही हालचाल तो आता निरखुन पाहु लागला. स्वतःच्या शरीराभोवती वेगाने गोलगोल फिरत मुंगी त्या वाळलेल्या पानाजवळ आली. पानाच्या काठाचा स्पर्श तिच्या शरीराला झाला. आपल्या शरीराची एक पलटी मारत ती मुंगी त्या पानावर चढली आणि पानावर चढुन उताणी झोपली. 

तो मुंगीची हालचाल निरखत होता. कांही क्षण असेच स्तब्धतेत गेल्यावर मुंगीने हालचाल सुरू केली. तिच्या हालचालीचा वेग हळुहळू वाढू लागला. स्वतःच्या शरीराभोवती ती परत एकवेळ गोलगोल फिरू लागली. अशी गोलगोल फिरतांना कांही वेळाने तिने आपल्या शरीराची पलटी मारून शरीर सरळ केले. आता ती त्या वाळलेल्या पानावर सरळ बसली होती. 

थोडा वेळ तसेच थांबून मुंगीने हळुहळु आपले पाय हालवायला सुरवात केली. पाय हालवत हळुहळु चालु लागली. चालत असता बहुधा तिचा आत्मविश्र्वास वाढला. तिने आपले पूर्ण शरीर ताणले. पाण्याने भिजुन तिच्या शरीराला चिकटुन राहिलेला तिचा एक पंख बाहेर आला. बाहेर आलेला तो एक पंख हळुहळु ती मुंगी खाली-वर करू सुरूवात केली. त्या एका पंखांची उघडझाप नेहमीप्रमाणे होऊ लागताच, तशाच रितीने मुंगीने दुसरा पंखही उघडुन तो वर-खाली करायला सुरूवात केली. दोन्ही पंख उघडझाप करण्याचा व्यायाम मुंगीने कांही वेळ केला आणि महाराजा, काय आश्चर्य! आपले दोन्ही पंख फैलावून डोळ्याची पापणी लवायच्या आत ती मुंगी पानावरून उडुनही गेली. 

मुंगी पानावरून उडुन गेल्याचे त्यांने पाहिले आणि तो भानावर आला. त्याच्या डोळ्यासमोर जंगलामध्ये प्रवेश करून वाटचाल करायला सुरूवात केल्यापासुन पाहिलेली प्रत्येक वेली, झाड, वृक्ष, बाडंगुळे, पशु-पक्षी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती मुंगी, सा-या घटना, प्रसंग, त्याच्या मनःचक्षुपुढे एखाद्या चलत चित्रपटाप्रमाणे उभे राहिले आणि अचानक जीवनासंबधी कांहीतरी महत्वाचे त्याला उमगले. आंघोळीच्या टबातुन जसा आर्किमिडीज नग्नपणे युरेका युरेका म्हणजे मला सापडले, मला गवसले, मला समजले म्हणत बाहेर आला होता तसा तोही त्याला जे ज्ञात झाले होते, त्याच्या आनंदात तिथेच तळ्याच्या काठावर नाचु लागला, ओरडु लागला, गाणे गाऊ लागला व गाता गाता रडुही लागला. 

आता आपले निरस, कंटाळवाणे, कटकटीचे, जबाबदारीचे, दुःख-त्रास, ताणतणावाचे जीवन तो विसरला. भविष्याच्या विचार तर त्याच्या मनातुन कधीच निघुन गेला होता. आता तो वावरत होता, जगत होता फक्त वर्तमान काळात, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये Present Tense म्हणजे बक्षीस, भेट मिळालेला काळ असेही म्हणतात. 

जंगलातून बाहेर पडून आपल्या घराकडे तो आता परतु लागला. रस्त्याने चालत असतांना तो हसत होता, रडत होता, ओरडत होता, नाचत होता, गात होता. मिळालेल्या ज्ञानाच्या आनंदात आपल्याच नादात आपली वाटचाल तो करत होता. रस्त्यावरून जाणारे कांही लोक त्याच्या त्या चाळ्यांकडे पाहात वेडा समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. कांही जण त्याच्या वेडसर चाळ्यांना हसत होते. कांही वात्रट, खोडकर लोक त्याला वेडा, वेडा म्हणुन चिडवत होते, तर कांही उपद्वयापी दुष्ट त्याला दगड मारत होते. दगडाचा माराने त्याचे शरीर जखमी व्हायचे, रक्त वाहु लागायचे पण, तो मात्र आपली वाट चालत राहीला, चालत राहीला, चालतच राहीला, आपल्याच मस्तीत, आपल्याच आनंदात...
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण