| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० ऑगस्ट २०२४
राज्यातील सरपंचांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी काही दिवसांपासून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने आंदोलन सुरू होते. या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर हजारो सरपंच आले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि (उबाठा) शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलन स्थळी भेट देत आपला पाठिंबा जाहीर केला होता.
या पार्श्वभूमीवर भाजपाचे संकटमोचक आणि महाराष्ट्र शासनातील मंत्री ना. गिरीश महाजन यांनी भेट घेऊन, सरपंचांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असून, यातील मानधन वाढीचा प्रस्ताव याच आठवड्यात मंजूर करण्यात येईल तर इतर मागण्या बाबत लवकरच पावले उचलले जातील असे म्हटले आहे.
यावेळी सरपंचांच्या शिष्टमंडळाशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की ग्रामपंचायत त्यांना अधिक निधी देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. सरपंचांच्या मानधन वाढीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेतला जाणार असून ग्रामपंचायतींच्या निधीबाबत सुवर्णमध्य काढला जाईल, असे सांगून ना. महाजन म्हणाले की, विकास कामांना 15 लाखांपर्यंत मंजुरी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात यावेत, असे मागणी आहे मात्र कोर्टाने तीन लाखापर्यंतच्याच कामासाठी मंजुरी देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यामध्ये सुवर्णमध्ये काढला जाऊन ग्रामीण स्तरावर विकासाची कामे मोठ्या प्रमाणे व्हावीत, अशी शासनाची ही भूमिका आहे त्यामुळे या तांत्रिक मागण्यांबाबत सचिवांबरोबर बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.
दरम्यान शासनाने सरपंचांच्या मानधनांमध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने, त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, इतर मागण्याबाबतही तात्काळ निर्णय घेण्यात यावा अशी मागणी सरपंच परिषदेमार्फत करण्यात येत आहे.