Sangli Samachar

The Janshakti News

धाकट्या भावाला किडनी देऊन शिराळ्यातील बहिणीची रक्षाबंधनाची अनोखी भेट !


| सांगली समाचार वृत्त |
बत्तीस शिराळा - दि. १४ ऑगस्ट २०२४
रक्षाबंधन हे प्रत्येक बहिण भावाच्या नात्याला अधिक दृढ करण्याचा धागा ! श्रीकृष्ण रुक्मिणीच्या भावा बहिणीच्या कथेपासून ते अगदी अलीकडे अनेक भावांनी आपल्या बहिणींना दिलेली विविध प्रकारच्या भेटी हा चर्चेचा विषय असतो. कोणी आपल्या बहिणीला महागडी कार, दागदागिने किंवा किमती कपडे देत असतो. तर कोणी आपल्या ऐपतीप्रमाणे साडी भेट देत असतो. परंतु या पार्श्वभूमीवर एका बहिणीने आपल्या भावाला किडनी दान करून अनोखे रक्षाबंधन साजरी केले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, शिराळा येथील सुजाता संदीप उबाळे या बहिणीने आपली बंधू धनाजी याला किडनी दान करून जीवदान मिळवून दिले. धनाजीच्या मातोश्रीने सुरुवातीला किडनी घेण्याची तयारी दर्शवली. मात्र वयाची अडचण आल्यामुळे सुजाता यांचे वडील आनंदराव यांनी सुजाता उर्फ चांदणी यांना देण्याबद्दल विचारले. सुजाताताई यासाठी तयार झाल्याही. मात्र याच दरम्यान पिता आनंदराव यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे ही शस्त्रक्रिया पुण्यातील डॉ. डी. वाय पाटील. रुग्णालयात 4 एप्रिल 2024 ऐवजी 8 ऑगस्ट 2024 रोजी यशस्वीरीत्या पार पडली. यासाठी डॉक्टर वृषाली पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे योगदान लाभले. 


आपल्या भावाला किडणीसारखा महत्त्वाचा अवयव उदान करून सुजाताताई उबाळे यांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करून दिला आहे. याबद्दल शिराळा तालुक्यातून व जिल्ह्यातून सुजाताताईंचे कौतुक करण्यात येत आहे