yuva MAharashtra शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर महाविकास आघाडीच्या प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी !

शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर महाविकास आघाडीच्या प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊन तसतसे राजकीय आखाड्यातील डाव प्रतिडाव रंगात येऊ लागले आहेत. इकडे महायुतीत भावी मुख्यमंत्री कोण हा वाद रंगला असतानाच, महाविकास आघाडीतही यावरून वादाचा कलगीतुरा पहावयास मिळाला. महायुती असो किंवा महाविकास आघाडी, मोठ्या भाऊ कोण ? यावरून आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याचे आराखडे बांधले जाऊ लागले आहेत.

महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीचे प्रचाराची धुरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवल्यानंतर, महाविकास आघाडी ही महत्त्वाची जबाबदारी कोणाकडे सोपवते ? याकडे राजकीय क्षेत्रासह जनतेचेही लक्ष लागून राहिले होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मिळवलेले राज्यातील यश पाहता महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षातर्फे एखाद्या नेत्यावर ही जबाबदारी सोपविले जाऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.


हे सारे आडाखे धुळीला मिळवत, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी, महाविकास आघाडीच्या प्रमुखपदी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे करून, अनेक पत्ते खेळले आहेत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जवळ जवळ 25 वर्षे एकत्रित निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे फडणवीस यांची निवडणुकीतील रणनीती ठाकरे चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळे महायुतीच्या प्रचार तंत्राला तोडीसतोड खेळी उद्धव ठाकरे खेळू शकतात असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही वाटते. आणि म्हणूनच कदाचित शरद पवार यांच्या सल्ल्यानेच काँग्रेसने ही चाल खेळण्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

उद्धव ठाकरे यांची निवडणुकीनंतर पुढील राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न आहे. परंतु या स्वप्नाला वेसन घालण्याचे काम राष्ट्रवादी व काँग्रेसकडून केले गेले. यामुळे उद्धव ठाकरे नाराज होते. त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देऊन, काँग्रेस, राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे, काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांना संदेश दिला असून, इतर घटक पक्षांनाही योग्य ते स्थान व मान देऊन ग्रामीण विधानसभा निवडणुकीला एक संघपणे सामोरे जाण्याचे ठणकावून सांगितले आहे.

आता उद्धव ठाकरे यांच्यावर महाआघाडीतील सर्व पक्षांना बरोबर घेऊन महायुतीच्या आरोप प्रत्यारोप यांना तगडे आव्हान देत, विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला अधिकाधिक आमदार कसे निवडून आणतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.