| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार होत्या. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने यामध्ये फेरबदल करीत पहिल्या टप्प्यात केवळ जम्मू-काश्मीर व हरियाणा या राज्यात निवडणुका घेण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. तर झारखंड आणि महाराष्ट्र या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात घेतल्या जातील, असे पत्रकार बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी म्हटले होते. परंतु आता महाराष्ट्रातील निवडणुका या डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे घाटत आहे. आणि याला कारणीभूत ठरत आहेत त्या 'महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' जाहीर केली. याचा पहिला 3000 रुपयांचा हप्ताही काही महिलांच्या बँक खात्यात जमा झाला. परंतु ही योजना केवळ निवडणुकीपुरतीच असल्याचा प्रचार विरोधी पक्षाकडून केला जात असल्याने, महिलांमध्ये चलबिचल वाढली होती. अशात काही महिलांच्या अर्जामधील त्रुटीमुळे, त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली नव्हती, त्यांच्यातही नाराजी होती. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यात महिलांच्या खात्यावर 'लाडकी बहीण योजनेतील रक्कम' जमा करून, त्यांच्यातील नाराजी दूर करायची आणि मगच निवडणुकीला सामोरे जायचे असा प्रयत्न महायुतीकडून केला जात आहे.
परंतु विधानसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत असल्यामुळे तत्पूर्वी निवडणुका घेण्याची आवश्यकता होते. मात्र निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी ही निवडणूक ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या सणांचे कारण देऊन डिसेंबर मध्ये घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. परिणामी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज पडू शकते. आणि यामागील कारण आहे ते 'महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची नाराजी'...