yuva MAharashtra विधानसभेसाठी भाजपची नवी रणनीती, अजित पवार यांनी स्वतंत्र लढण्यासाठी दबाव !

विधानसभेसाठी भाजपची नवी रणनीती, अजित पवार यांनी स्वतंत्र लढण्यासाठी दबाव !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ ऑगस्ट २०२४
विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसतसे राजकीय डावपेच नव्याने आखले जात आहेत. एकीकडे महाआघाडीतील पक्ष एक संघपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असतानाच, महायुती मात्र स्वतंत्र चूल मांडण्याची तयारी करीत आहे. यामध्ये अजित पवार यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी यासाठी स्पक्षीयांप्रमाणेच भाजपमधूनही त्यांच्यावर दबाव येत आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेल्या फटक्याचा अजित पवार यांच्यावर ठपका ठेवला गेला होता. त्यानंतरही सातत्याने भाजप अंतर्गत नाराजी नाट्य सुरूच आहे. संघ संचालित प्रसिद्धी माध्यमातून याबाबत अजित पवार यांनाच टार्गेट केले जात आहे. त्यामुळे आता विधानसभेला पराभवाचा सामना करावा लागू नये म्हणून भाजप नवी रणनीती आखत आहे. अजित पवार यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी आणि जिथे त्यांचे उमेदवार असतील तिथे भाजप व शिंदे शिवसेना यांनी त्यांना पाठिंबा द्यावा, यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.


भाजपने आखलेली ही रणनीती प्रत्यक्षात आली, तर त्याचा सर्वाधिक तोटा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होऊ शकतो. ज्या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादीचा उमेदवार असेल, त्या ठिकाणी अजित पवार गटाचा उमेदवार उभा राहिल्यास मत विभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीला होईल अशी ही एक चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार गटातील काही नेते स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. स्वतंत्रपणे लढल्यास महाआघाडी आणि महायुती दोन्हीकडून आपल्या उमेदवारास धोका होऊ शकतो, असे काही नेत्यांचे म्हणणे आहेत. तर त्याचवेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यास, त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. लोकसभेला महाआघाडीने भाजपा बरोबरच अजित पवार गटाला टार्गेट केले होते. त्यामुळे अजित पवार यांना सामावून घेऊन महायुती निवडणुकीला सामोरे गेल्यास, मतदारांच्या नाराजीचा फटका महायुतीच्या सर्वच उमेदवारांना बसू शकतो. आणि म्हणूनच अजित पवार यांनी विधानसभा स्वतंत्र लढवण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढू लागलेला आहे.