| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑगस्ट २०२४
रत्नागिरी येथे 'लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी' सांगली बस डेपोतील वीस बसेस कोल्हापूरला पाठवण्यात आल्या. यामुळे बसेसचा तुटवडा होऊन प्रवाशांचे झालेली गैरसोय लक्षात आल्याने ठाकरे गटाच्या वतीने बस स्थानकात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बसवरील छायाचित्रास काळे फासत निषेध व्यक्त करण्यात आला.
ही बाब शिंदे गटाच्या कानावर गेल्यानंतर काही पदाधिकारी तेथे पोहोचले आणि त्यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवरील लावण्यात आलेला काळा रंग पुसून काढला. यामुळे चिडलेले आंदोलक शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी भिडले. परंतु हा वाद विकोपाला जाण्यापूर्वीच पोलिसांनी मध्यस्थी करीत दोन्ही गटाला बाजूला केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दरम्यान ठाकरे गटाचे पदाधिकारी चंद्रकांत मैगुरे, किरण कांबळे, महादेव हुलवान, आनंद रजपूत, शकिरा जमादार यांना ताब्यात घेतले आहे. आंदोलनाच्या दरम्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अवमान केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत शिंदे गटाचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.