yuva MAharashtra मिरज व जत विधानसभा मतदारसंघावर जनस्वराज्यने हक्क सांगितल्याने खळबळ !

मिरज व जत विधानसभा मतदारसंघावर जनस्वराज्यने हक्क सांगितल्याने खळबळ !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीस एकसंघपणे सामोरे जाण्याचा महायुतीचा प्रयत्न सफल होणार का ? असा प्रश्न मिरज व जत मतदार संघावर जनसुराज्य पक्षाने हक्क सांगितल्याने निर्माण झाला आहे. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. विनय कोरे यांनी मिरजेतील कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागावे असा आदेश दिल्याने, महायुतीत संघर्षाचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिरज आणि जत हे दोन्हीही भाजपाचे बालेकिल्ले मानले जातात. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विक्रमसिंह सावंत यांनी विजयाची गुढी उभारून भाजपला शह दिला असला तरी, यावेळी विक्रमसिंह सावंत मतदारांसह पक्षांतर्गत मोठी नाराजी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात विशाल दादांनी आघाडी घेतली असतानाच जतमध्ये मात्र भाजपाने मुसंडी मारली होती. त्यामुळे यावेळी विक्रमसिंह सावंत यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यापासून मतदारांपर्यंत आपली बाजू भक्कम करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत.

जत मतदार संघात विलासराव जगताप हे किंगमेकर समजले जातात. असे असूनही विशाल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या जगताप यांना जतमधून देता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने तसेच रवी पाटील या तगड्या उमेदवाराने भाजपकडून तयारी सुरू केल्याने येथे पुन्हा भाजप गड राखण्यात यशस्वी होईल असे बोलले जात आहे.


मिरज मतदार संघातही विद्यमान पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. मिरज विधानसभा मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य घेतले होते. तशाच डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे उजवे हात समजले जाणारे प्रा. मोहन वानखंडे सर यांनीच बंडाचे दंड थोपटले आहेत.

महायुती बाबत मतदारात असलेले नाराजी, लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले अपयश आणि बंडखोरांनी खाल्लेली उचल हे डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या विजयादरम्यानचे स्पीड ब्रेकर मानले जातात. या पार्श्वभूमीवर जत आणि मिरज येथून भाजपा भाकरी फिरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच काल नूतन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र वाटप करण्याच्या कार्यक्रमात बोलताना आ. विनय कोरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीस तयार राहण्याचे आवाहन केल्यानंतर, या ठिकाणी महायुतीतून जनसुराज्य पक्षाला संधी मिळणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावेळी जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन व्हनखंडे, मिरजेचे माजी नगराध्यक्ष डॉ. महादेव कुरणे यांच्यासह अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. कोरे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीसाठी चांगले काम केले आहे. त्यावेळी आम्ही एकाही जागेचे मागणी केलेले नव्हती, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातील जत व मिरज या दोन मतदारसंघाची जागा आम्हाला मिळावी असा आमचा आग्रह आहे, असे आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केलेली आहे. लवकरच याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची आशा आ. कोरे यांनी व्यक्त केली.

आता भाजपा आपले हे दोन मतदारसंघ जनसुराज्य पक्षाला सोडणार का ? आणि जर तसा निर्णय झाला नाही, तर जनसुराज्य पक्ष काय निर्णय घेणार ? तसेच जर दोन्ही मतदारसंघ पक्षासाठी सोडले, तर येथे तयारी करीत असलेले संभाव्य उमेदवार काय निर्णय घेणार ? याबाबत राजकीय वर्तुळात व मतदारात उत्सुकता लागून राहिली आहे.