Sangli Samachar

The Janshakti News

पुस्तक वाचून झाल्यावर मूळ मालकाला परत करावे ! (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. २ ऑगस्ट २०२४
एके दिवशी वाचनालयामध्ये पुस्तके चाळत असतांना एका पुस्तकाच्या आतील पहिल्या पानावर "पुस्तक वाचून झाल्यावर ते मूळ मालकाला परत करा” अशी सूचना लिहीली होती. मी ती सूचना वाचली आणि अशी सूचना पुस्तकावर लिहीण्यामागे पुस्तकाच्या त्या मूळ मालकाचा काय हेतु असावा ? पुस्तक वाचण्याच्या हेतुने दिले आहे. जो कोणी पुस्तक वाचण्यासाठी घेईल त्यांने ते वाचावे, नेऊन नुसतेच घरी ठेऊ नये, म्हणजे ज्यासाठी ते घेतले आहे त्या हेतुची पूर्तता करण्याची जबाबदारी पुस्तक घेणा-याची आहे असे पुस्तकाच्या मालकाला कदाचित सांगावयाचे असावे.
 
पुस्तकामध्ये अशी सूचना देण्यामागे त्या पुस्तकाच्या मूळ मालकाचा असाही हेतू असावा की, ते पुस्तक सद्या ज्याच्या हातामध्ये आहे तो त्याचा मालक नाही तर, त्याचा मालक दुसरा कुणीतरी आहे याची जाणीव त्या पुस्तकाच्या वाचकाला व्हावी. आणि मूख्य म्हणजे पुस्तकावर अशी सूचना लिहीण्यातुन पुस्तक वाचुन झाल्यावर म्हणजे ते ज्या हेतुने घेतले आहे तो हेतू पूर्ण झाला की ते मूळ मालकाला परत करणे हे ते पुस्तक घेणा-याचे कर्तव्य आहे, असे बजावयाचे असेल.    

पुस्तकावर सूचना लिहीण्याबाबत माझ्या मनामध्ये आलेल्या विचारातुन मी बाहेर येत असतांना माझ्या मनातील "तो" कोपरा उपस्थित झाला आणि मला म्हणाला, 

"राजा, मागून घेतलेली वस्तु ती वस्तु घेण्याचा हेतू पूर्ण झाला की ती ज्या स्वरूपात मिळाली होती त्याच स्वरूपात मूळ मालकाला परत करावी अशी सूचना फक्त पुस्तकाबाबतच लागू पडते की इतर वस्तुनांही लागू पडते?"

माझ्या मनातील त्या कोप-याच्या प्रश्नावर मी उत्तरलो, 

"अरे, आजच्या काळात कॅमेरा, फ्लॅट, मोबाईल, लॅपटॉप, पैसे अशा कितीतरी वस्तुंची देवाणघेवाण मित्र, नातेवाईक, कंपनी, मालक यांच्यामध्ये होत असते. त्यामुळे ऺहेतू पूर्ण झाल्यावर वस्तु मूळ मालकाला परत करा' ही बाब पुस्तकापुरतीच मर्यादित नसून अन्य कितीतरी गोष्टींना, वस्तुंना लागू आहे." 


माझ्या उत्तरावर माझ्या मनातील 'तो' कोपरा मला म्हणाला, 

"राजा अगदी बरोबर, ऺहेतू पूर्ण झाल्यावर वस्तु मूळ मालकाला परत करायची असते, हे विधान पुस्तकापुरतेच मर्यादित नसून अन्य कितीतरी गोष्टींना, वस्तुंना लागू आहे तर, तुझे सुंदर शरीर, हा मानवी देह, हे जीवन त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायकाने तुला कोणत्या उद्देशाने, हेतूने तूला दिले असावे?"

माझ्या मनातील त्या कोप-याच्या प्रश्नावर मी विचार करू लागलो आणि मला 'पृथ्वीवर प्रत्येक जीव निर्माण करतांना देवाचा एक विशेष हेतु असतो आणि ते विशिष्ट कार्य करण्यासाठी प्रत्येकजण पृथ्वीवर अवतरत असतो.' अशा अर्थाच्या एका पुस्तकातील-१ कांही ओळी मला आठवल्या. 

पुस्तकातील त्या ओळींनी माझ्या मनातील विचारांचा कोळ्याने आपल्या जाळ्याच्या कक्षा रूंदावल्या आणि मी माझ्या मनांत एक विचार आला. 'धर्मसंस्थापक, संत, योगी, तत्वज्ञ, समाजसेवक, समाजसुधारक, शास्त्रज्ञ अशा महान व्यक्तींच्या जीवनाचा कांही विशिष्ट हेतु असतो, त्याच्या पुर्ततेसाठी परमेश्वर त्यांना पृथ्वीवर पाठवतो हे खरे आहे. पण चाकोरीबद्ध आयुष्य जगणारा मी एक सर्वसामान्य माणूस, मला जीवनात ना कांही मोठे ध्येय ठरवता येते, ना कोणता मोठा उद्देश अंमलात आणता येतो, ना माझ्या हातून कधी एखादे मोठे कार्य घडते.

आयुष्यातील घटना एका चाकोरीमध्ये फिरत राहतात. आयुष्यामध्ये भव्य, दिव्य असे कांही घडत नाही. बांधलेल्या पोहण्याच्या तलावात डुबक्या मारत राहणा-या माझ्यासारख्या सामान्याला समुद्रामध्ये पोहायचे तर दूर, समुद्र कसा असतो याचा विचारही करता येत नाही. माझ्या जीवन हे असे सामान्य चाकोरीबद्ध आहे तर मला, या सर्वसामान्य व्यक्तीला, त्या महानायकाने कोणत्या विशिष्ट कार्यासाठी पृथ्वीवर पाठवले असावे? 

कितीही विचार केला तरी मनात उठलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला सुचेना. माझे मन खट्टु झाले आणि फिरून एक वेळ माझ्या मनातील 'तो' कोपरा अवतरला व मला म्हणाला, 

"राजा आपल्या सिमीत बुद्धीला ज्यावेळी आपल्याला प्रश्नाची समाधानकारक उत्तर मिळत नाही त्या वेळी त्या असीमाला शरण जावे"

माझ्या मनातील त्या कोप-याचा सल्ला मला पटला आणि मी परमेश्र्वराची प्रार्थना करू लागलो, 

“हे दिनदयाळा, मी तुला शरण आलो आहे. मी गोंधळून गेलो आहे, अज्ञानामुळे मला माझ्या जीवनाचा हेतू न समजल्याने माझ्या मनात भावनांचा उद्रेक उसळला आहे. त्यामुळे मी दुःखी आहे. हे कृपाळा, तू कुब्जेला सुंदर बनवलेस, अहिल्येचा उद्धार केलास, क्रुर वाल्या कोळ्याचा ऋषी वाल्मिकी बनविलास, अर्जुनाला मार्गदर्शन करून विजय प्राप्त करून दिलास, माझ्यावरही कृपा कर. अनुत्तरीत प्रश्नाच्या मनःस्थितीतून मला बाहेर काढ. मला, मार्गदर्शन कर. मला, या सामान्य जीवाला हा मनुष्य देह देऊन पृथ्वीतलावर पाठवण्यामागे तूझा कोणता हेतु आहे?” 

मनाच्या अगदी खोलवर जाऊन तळमळीने केलेल्या प्रार्थनेमध्ये एक शक्ती असते. अशा प्रार्थनांना सर्वांचे दुःख हरण करणारा हरी प्रतिसाद देतो. एखाद्या व्यक्तीशी झालेले संभाषण, एखाद्या पुस्तक-कवितेतील कांही ओळी, एखादी साधी हालचाल, वातावरणातील अचानक पडलेला फरक, एखादे चित्र, ज्याची आपणाला कधीच पूर्वकल्पना नसते अशा कुठल्या ना कुठल्या रूपाने ‘तो’ मदत करतो, संकेत दाखवितो, संदेश देतो. अंतर्दृष्टी प्रदान करून जीवनाच्या अंधारी वाटेवर मार्गदर्शन करतो.  

मला उत्तर न मिळालेल्या माझ्या प्रश्नाबाबतही असेच झाले. अचानक मला ‘भगवंताचा सर्वात प्रिय भक्त मीच हा नारदाचा गर्व हरण करण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या जबाबदा-या पार पाडून दिवसातून फक्त दोन वेळ भगवंताचे नांव घेणारा शेतकरी हाच भगवंताचा सर्वात प्रिय भक्त आहे’ ही कथा व कथेचा मतीतार्थ मला आठवला-२. आणि मला माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला गवसले.

तो दीनानाथ प्रत्येक जीवाला कांही विशिष्ट हेतुने वेगळेपणा देऊन पृथ्वीवर पाठवत असतो. पण पृथ्वीवर सर्व जीव एक सारखे झाले तर जीवनातील रस संपून जाईल, जीवन निरस होईल हे ‘त्याला’ ज्ञात असते. त्यामुळे कांही फुलांना तो फक्त सुगंध पसरवण्याच्या हेतुने पाठवतो, तर कांहीना सुंदर छटा देऊन सर्वांचे मन प्रसन्न करण्याची जबाबदारी देतो. कांही वृक्षांनी आपली मधुर फळे देऊन वाटसरूची भूक भागवावी या हेतूने, तर कांहीनी आपल्या विशाल सावलीमध्ये सर्वांना विसावा द्यावा या हेतूने त्यांना तो पृथ्वीतलावर पाठवतो. 

आपल्या ज्ञानाने, कार्याने सर्वसमाज सुखी करावा या विशिष्ट हेतूने ‘तो’ महान, विद्वान व्यक्तींना पृथ्वीवर पाठवतो. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्याची निर्मिती ‘तो’ करतो आणि पृथ्वीवर पाठवतो ते एखाद्या लहान कुटुंबातील व्यक्तींना प्रेम, माया, ममता मिळावी, त्यांचे पालनपोषण केले जावे, मुलांना चांगले संस्कार, शिक्षण दिले जावे, त्यांनी चांगला माणूस बनावे, घरातील आई-वडिल, वृद्धांची सेवा केली जावी, व सुदृढा बरोबरच दिनदुबळे, अपंग यांचे जीवनही आनंदी समाधानी करावे या विशिष्ट हेतुच्या पूर्तीसाठी. 

आकाशाची निर्मीती करणा-या ‘त्याला’ आकाशाला मर्यादा घालायची नसते, पण हा संसार चालावा, सर्वांचे योगक्षेम पाहिले जावे, या हेतुच्या पुर्तीसाठी प्रत्येक जीवाच्या कर्तृत्वाला मर्यादा घालणे ‘त्याला’ भागच असते. त्यामुळे माझ्या कर्तुत्वाला त्याच्या इच्छेनेच आपोआप मर्यादा पडतात. पण मर्यादित कर्तृत्व असले तरी हेतुच्या पुर्तेतेसाठी जितके आवश्यक आहे तितके ‘तो’ देतच असतो. पण माझ्या सारख्या अज्ञ जीवाला हे समजत नाही. इतरांच्या यशस्वी, महान जीवनाशी मी माझ्या सामान्य जीवनाशी व्यर्थ तुलना करतो आणि मनोमन दुःखी होतो.

माझ्या प्रश्नाला मला मिळालेल्या उत्तराने माझे समाधान झाले. हे समाधान मला प्राप्त करू देण्या-या ‘त्या’ हातांची मला जाणीव झाली आणि आपोआपच माझे डोळे मिटले गेले, हात जोडले गेले व हृदयामध्ये त्या परमदयाळू परमेश्वराचे स्तवन त्यांनेच दिलेल्या स्फुर्तीने स्त्रवु लागले, “हे निराश्रीतांच्या अश्रीता, तू मला दिलेल्या या जीवनरूपी पुस्तकातील बरीच पाने आता वाचून झाली आहेत. आता कांही शेवटची पाने फक्त उरली असावीत. या उरलेल्या पानांवर ‘तू’ कोणत्या हेतूची अक्षरे उमटवली आहेस हे ‘तुला’च माहीती आहे. माझी ‘तुला’ फक्त एकच प्रार्थना आहे की या पानांतील ‘तुझ्या’ हेतूच्या पुर्ततेसाठी ‘तूच’ मला सक्षम कर म्हणजे, हे पुस्तक ज्याचा मूळ स्वामी ‘तू’ आहेस, वाचून संपल्यावर तुझ्याकडे परत येऊन तिथेच स्थिर होईल. 

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः!!!”
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण       
               
१. ‘अग्निपंख’, आत्मचरित्र, ए पी जे अब्दुल कलाम, सहाय्यक, अरूण तिवारी, अनुवादः माधुरी शानभाग, राजहंस प्रकाशन, सहावी आवृत्तीः नोव्हेंबर २००३, पुनर्मुद्रणः जूलै २००४ ISBN -81-7434-144-7

२. जिज्ञासुंनी ही कथा वाचण्यासाठी दुआ – https://www.patrika.com › Astrology and Spirituality https://www.navhindu.com