| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. १० ऑगस्ट २०२४
मी, इतरांसारखाच एक, भविष्यामध्ये काय घडणार या बद्दल अनभिज्ञ असलेला, आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून कुटुंबाची काळजी घेत, आला दिवस पार पाडणारा, फारशा कोणाच्या अध्यामध्यात न पडणारा सर्वसामान्य माणूस. तसे माझे रोजचे जीवन सरळ कांहीही मोठी उलथापालथ न होता एका रेषेत सुरू असते. पण कधी कधी या सरळ रेषेतील जीवनात असे कांही प्रसंग येतात आणि आता आपल्यापुढे कोणते ताट वाढून ठेवले आहे, कोणत्या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यावे लागणार आहे, यावर विचार करत माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस चिंता करत बसतो.
कांही दिवसांपुर्वी माझेही असेच झाले. एका किरकोळ घटनेचे पुढे काय परिणाम होऊ शकतील यावर मी विचार करू लागलो. विचार कसला चिंता करू लागलो अन्, म्हणतात ना मन चिंती ते वैरीही न चिंती... तशी माझी अवस्था झाली. उठता-बसता, जेवण करताना, वर्तमानपत्र वाचतांना, इतकेच काय टॉयलेट-बाथरूममध्ये असतांनासुद्धा मनामध्ये नुसते विचारांचे थैमान. असे घडले तर काय होईल, मी काय उत्तर देईन, यातून माझी सुटका कशी करून घेता येईल. मनांत वारंवार येणारे तेचतेच विचार. मन अगदी बेचैन होऊन गेले.
एक पूर्ण दिवस याच अवस्थेत गेला. दुस-या दिवशीही सकाळी उठल्यापासून चिंतेचे, विचारांचे रहाटगाडगे सुरू. अध्यात्मावरील-होकारार्थी विचारांची पुस्तके चाळून झाली, ध्यान लावण्याचा प्रयत्न करून झाला, 'अरे कर नाही त्याला डर कशाला ?' चिंता करून कांही साधत नाही उलट त्रासच होतो, 'ठेवले अनंते तैसेची रहावे' अशी माहितीची वचने, वगैरे सर्व मनांत वारंवार घोळून झाले पण, मनाची बेचैनी व चिंता कांही केल्या कमी होईना. काय करावे हे कांही सुचेना.
शेवटी कंटाळून वाचनालयामध्ये जाऊन पुस्तक तरी बदलून आणुया असा विचार मी केला आणि वाचनालयाकडे जाण्यासाठी बसस्टॉपवर आलो. बसमधून प्रवास करतांना माझ्या चिंतेचे कारण असलेल्या घटनेसंदर्भात एक फोन आला, चिंता थोडीशी कमी झाली. पण विचारचक्र चालूच राहिले. तशाच अवस्थेत वाचनालयामध्ये पोहोचलो. अध्यात्म, सध्याची सामाजिक स्थिती, थोर व्यक्तींचे चरित्रे, आत्मकथा आदि विषयावरील पुस्तके वाचनालयातील रॅकवर विषयवार ओळीने काचेचे उघडझाप करणारे दार असलेल्या कपाटात उभी मांडून ठेवलेली होती. नेहमीची वेळ असती तर त्यातून एखादे घेऊन मी परतलो असतो. पण मनामध्ये विचारांचे काहूर माजले असतांना अलंकारिक शब्द, भाषासौंदर्य, गहन, जड विचार असणारे कांही वाचण्यास मनाचा कल होईना. ओळीतील एकामागून एक पुस्तक पहात गेलो आणि एका लहानशा पुस्तकाने* माझे लक्ष वेधून घेतले. पुस्तक हातात घेऊन चाळायला सुरूवात केली आणि मनाने कौल दिला, चला आज माझ्या थकलेल्या मनाचा थकवा यातून तरी कमी होतो का पाहूया.
पुस्तक घेऊन घरी आलो आणि चार-पाच पानांच्या एकूण चौदा छोट्याछोट्या कथा असलेले ते पुस्तक वाचायला सुरूवात केली आणि, महाराजा काय सांगू, मी त्या कथांमध्ये एवढा गुंगुन गेलो की माझ्या मनांतील ते नकारार्थी, चिंतेचे विचार तर लुप्त झालेच पण मी स्वतःला विसरलो.
असे काय होते या कथांमध्ये ? या कथांमध्ये होते बोलणारे पक्षी, प्राणी, चिमण्या, कावळे, कबुतर, उंदीर, मांजर. या कथांमध्ये होते. घरी काळीज ठेऊन येणारे माकड, दिवसा सुंदर तरूणी व रात्री नाग होणारी नागकन्या, या कथामध्ये,
“दूर दूर नदी
नदीत हिरवा-तांबडा मासा
माशाच्या आत काळा भुंगा
भुंग्याच्या आत छोटी डबी
डबीत नवलाखाचा हार
हारात माझा जीव
गळ्यात हार घाल
जाईल माझा प्राण!”
असे दुष्ट चेटकीन राणीला सांगणारी सुंदर परी.
खरं तर, अशा या कथांमध्ये होते प्रौढ होतांना मी स्वतःच हरवलेले माझे बालपण.
पुस्तकातील कथा वाचतांना मला भेटले एक कोकरू आपल्या आजीच्या घरी जाणारे. रस्त्यामध्ये त्याला अडवून तुला खातो म्हणणारा कोल्हा, गिधाड, वाघ, लांडगा, कुत्रा आणि सर्वात शेवटी एक गरूड. आणि या सर्वांना “आज्जी घरी जाईन, लठ्ठ मुठ्ठ होईन, मग तू मला खा” असे सांगून, आज्जी घरी भरपूर खाऊन पिऊन एका ढोलात बसून परत जाताना यातील कुणी विचारले,
“ढोलक्या ढोलक्या कोकरू पाहिलेस कां?”
आणि कोकरू उत्तर देई,
“कोकरू गेले रानात, तू पण जा रानात, चल ढोलक्या चल ढुम ढुम ढुम!”
असे हे सर्व वाचतांना मी माणसांच्या भाषेत बोलणा-या त्या प्राण्यांशी, पक्ष्यांशी, परीशी, त्या वातावरणाशी, त्या वेळेशी, एकरूप होऊन गेलो. माझी चिंता, माझे विचार दूर कुठेतरी पळून गेले. माझे मन मला पंचावण्ण-साठ वर्ष मागे घेऊन गेले. मी परत एकवेळ गावातील आनंद चित्रमंदिरामध्ये एक आण्याचे तिकीट काढून सकाळी दहावाजता लॉरेल-हार्डीचा सिनेमा पाहतांना पोट घरून खो-खो हसत-हसत खुर्चीत लोळणारा आठ-नऊ वर्षांचा मुलगा झालो. आणि मी हसू नये तरी कां?
लॉरेल-हार्डी म्हणजे आमच्या ओळखीच्या जाड्या-रड्याची जोडी. इमारतीच्या दुस-या-तिस-या मजल्यावर राहणा-या मुलीला संकटातून सोडवून आणण्यासाठी जाते. जाड्या रड्याला आपल्या कंबरेला दोर बांधण्यास सांगतो आणि दोराचे दुसरे टोक ती मुलगी राहात असलेल्या खिडकीच्या हुकाला अडकवुन खाली सोडतो. रड्या दोराचे दुसरे टोक ओढून जाड्याला वरती खेचण्याच्या प्रयत्नात जाड्याला दोन-तीन वेळ जमीनीवर पाडतो. शेवटी रागावून जाड्या दोरीचे टोक जवळच्या गाढवाला बांघतो आणि रड्याला त्यावर बसवून गाढवाला लांब न्यायला सांगतो. जसजसे गाढव दूर जाऊ लागते तसतसा जाड्या वरवर जाऊ लागतो आणि खिडकीच्या जवळ पोहचतो. खिडकीजवळ आल्यावर जाड्या शिळ वाजवून रड्याला खुणावतो. रड्या गाढवावरून खाली उतरतो आणि मग .... परत एक वेळ जाड्या जमीनीवर येऊन धाडकन पडतो आणि त्याच्या वजनाने दोरीच्या दुस-या टोकाला बांघलले गाढव खिडकीमध्ये जाऊन पोहचते.
ही अशी सर्व जम्माडीजम्मत आठवून मला हसू फुटले आणि त्यामध्ये ती चिंता, विचार विसरले गेले. हे असे कसे काय घडले? असे काय आहे या छोट्या कथांमध्ये जे आपल्या प्रौढ मनालाही इतके भावत असते? या व अशा प्रश्नांचे उत्तर एकच आहे, यामध्ये आहे निरागसता, एका आठ-नऊ वर्षांपर्यंतच्या लहान मुलाच्या मनाची. यात आहे त्याच्या मनाची निर्मळता, जी समोर येणारी, दिसणारी, समजणारी प्रत्येक गोष्ट निर्मळ करते. यात आहे तो क्षणाचा रूसवा-फुगवा, जो दुस-याच क्षणी गाढ प्रेमात बदलून जातो. यात आहे ते बालपण जे प्रौढ वयाच्या ओझ्यामध्ये दबुन गेलेले असते आणि कितीही रूपये खर्चून, प्रयत्न करून परत आणता येत नाही. यात असतो फक्त एकच काळ – वर्तमानकाळ, जो आनंदाने भरून आणि भारून गेलेला असतो. त्यामध्ये ना असते भूतकाळातील कटुता – दुःख, ना भविष्यकाळाची चिंता. असतो तो फक्त एक क्षण, जगण्याच्या, जीवनाचा पुरेपुर उपभोग घेण्याचा, निखळ आनंद लुटण्याचा.
हाच तो काळ होता ज्यावेळी मला वाटेत भेटणा-या उंदराशी माझे मन एक होऊन जाते. मग तो उंदीर व मी यामध्ये अंतर ते कसले राहात नाही. मग रस्त्यामध्ये मिळालेले फडके घेऊन उंदीराच्या ऐवजी मीच धोब्याकडे जातो आणि त्याला सांगतो,
“धोबीदादा, धोबीदादा माझे फडके धुवून दे.” धोब्याने फडके धुवून दिले की मी जातो शिंप्याकडे.
“शिंपीदादा, शिंपीदादा, मला एक छानशी टोपी शिवून दे आणि तिला रंगीत गोंडेही लाव.”
शिंप्याने मला टोपी शिवून दिली की ती मी डोक्यावर घालतो आणि ढोलकेवाल्याकडून एक ढोलके मागून घेतो. मग ती टोपी घालून, वा-याबरोबर तिचे हलणारे लाल-निळे-हिरव्या रंगाचे गोंडे मानेने आणखी जास्त हालवत ढोलके वाजवत, रस्त्यावर ऐटीत चालू लागतो. चालता चालता गाऊ लागतो,
“राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम, ढुम, ढुमाक, ढुम, ढुम, ढुमाक!”.
मग मी राजाच्या राजवाड्यापुढे येतो. राजा माझे गाणे ऐकतो आणि शिपायांना सांगतो,
“जा, त्या उंदराला पकडून आणा.”
शिपाई मला पकडून राजाच्या दरबारात नेतात. राजा रागाने माझी टोपी काढून घेतो. पण मीही कांही कमी हुशार नाही. मी लगेच गाऊ लागतो...
“हो, होऽऽ, राजा भिकारीऽऽ, माझी टोपी घेतलीऽऽ, ढुम, ढुम, ढुमाक, ढुम, ढुम, ढुमाक!”
आता राजा खूपच रागवतो आणि माझी टोपी माझ्याकडे भिरकावुन देतो. लगेचच रूबाबात मी ती माझी सुंदर गोंड्याची टोपी पुन्हा डोक्यावर घालतो आणि गाणे गाऊ लागतो,
“हेऽऽहे, राजा मला भ्यालाऽऽ, माझी टोपी दिलीऽऽ. ढुम, ढुम, ढुमाक, ढुम, ढुम, ढुमाक!”
आणि मग मी गाणे गात गात ऐटीत राजवाडयातून निघून जातो.
सांगायचा मुद्दा हा की, आपण दुःखी असलो, त्रासलेले असलो, एखाद्या गोष्टीची आपल्याला जर चिंता वाटत असेल, मनामध्ये ताण, तणाव असेल तर, खुशाल आपल्या बालपणात जाऊया आणि ते शुद्ध, पारदर्शी, निर्मळ जीवनातील हलकेफुलके क्षण आठवुन आजचा वर्तमानकाळ आनंदी करूया.
तर मित्रांनो, लेख वाचुन झाला, आवडला असेल, पटला असेल तर मग होऊन जाऊंद्या, ढुम, ढुम, ढुमाक, ढुम, ढुम, ढुमाक!
- आजचे बोल अंतरगाचे पूर्ण*
*या लेखामध्ये उल्लेख केलेले पुस्तक व परी राणीची कविता पंजाबच्या लोककथा भाग दुसरा, लेखिका – दुर्गा भागवत, प्रकाशकः केशव कृष्णा कोठावळे, मुंबई – ४, पहिली आवृत्ती ऑगस्ट १९७३ या मधील आहे.