yuva MAharashtra ऑलम्पिकमधील सुवर्णस्वप्न भंगले तरी विनेश फोगाट भारतासाठी विजयीकन्याच !

ऑलम्पिकमधील सुवर्णस्वप्न भंगले तरी विनेश फोगाट भारतासाठी विजयीकन्याच !


| सांगली समाचार वृत्त |
चंदीगढ - दि. ९ ऑगस्ट २०२४
लैंगिक शोषणाचा आरोप करीत, महिला कुस्तीगिरांवरील होणाऱ्या कुचंबनेबाबत रस्त्यावर उतरलेल्या फोगाट भगिनींना पोलिसांनी फरपटत नेले, त्यापैकी एक असलेल्या विनेश फोगाट हिचे ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत दाखल होऊनही, सुवर्ण स्वप्न भंगल्यानंतर विनेशवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतो आहे. तिचे गृहराज्य असलेल्या हरियाणा सरकारने तर मोठी घोषणा केली आहे. 

हरियाणाचे मुख्यमंत्री नायर सिंग सैनी यांनी म्हटले आहे की, आमच्या हरियाणाची शूर कन्या विनेश फोगाटने जबरदस्त कामगिरी करत फायनल मध्ये प्रवेश केला होता. काही कारणामुळे तिला ऑलिंपिकमधील अंतिम सामना खेळता आला नसला, तरी आमच्यासाठी ती विजेतीच आहे. आणि म्हणूनच एखाद्या पदक विजेत्या प्रमाणेच तिचे स्वागत केले जाईल. हरियाणा सरकार ऑलम्पिक मध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्यांना जो सन्मान बक्षीस आणि सेवा देतात, त्याच सर्व सोयी सुविधा विनेश फोगाटला अगदी कृतज्ञतेने दिला जातील, अशी घोषणा नायब सिंग सैनी यांनी केली आहे.


पदक न जिंकताही विनेश फोगाट हिने जे धैर्य दाखवले आहे, त्याबद्दल सर्वच क्षेत्रातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. अगदी अनपेक्षितपणे ऑलिंपिक मधून बाहेर पडल्यानंतर देशातील नेत्यांबरोबरच अनेक सेलिब्रेटीनीही तिला पाठिंबा देत, खचून न जाण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत अनेकांनी विनेशला धीर देत, आम्हाला तुझा अभिमान असल्याचं अभिमान असल्याचं सांगितलं आहे.


अवघं 100 ग्रॅम वजन अधिक झालेल्या विनेशला अंतिम सामना खेळू देण्यात आला नाही. माजी वर्ल्ड चॅम्पियन बरोबरच अनेक नामांकित महिला कुस्तीपटूंना आस्मान दाखवित अंतिम फेरीत पोहोचलेली विनेश नक्कीच सुवर्णपदक घेऊन येईल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र थोड्याशा वजनाने तिचा आणि भारताच्या या स्वप्नांचा घात केला. तरीही संपूर्ण देश आज तिच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे.