| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ७ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षावरील हक्काची लढाई 14 ऑगस्टपर्यंत पुढे गेल्याने दोन्ही पक्षातील नेते व कार्यकर्त्यांचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागला आहे. परंतु याच वेळी सुप्रीम कोर्टात शिवसेनेचे बाजू मांडणारे असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे, 14 ऑगस्ट ला सुप्रीम कोर्ट याबाबत थेट निर्णय देऊ शकते आणि शिवसेना ठाकरे यांच्या ताब्यात जाऊ शकते असे सरोदे यांनी म्हटले आहे.
विधानसभा अध्यक्ष सुनील नार्वेकर यांनी शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे आमदार पात्र ठरवल्याने दोन्ही पक्ष हक्काच्या लढाईसाठी सुप्रीम कोर्टात गेले होते. नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान, शिवसेनेचे सुनावणी पूर्ण झाली. परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाने अजून काही कागदपत्रे सादर करण्याच्या व मुख्य वकील नेमण्याच्या मुद्द्यावर वेळ मागून घेतली. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी राष्ट्रवादीच्या वकिलांचे चांगलीच कानउघडणी केली.
सरोदे यांच्या म्हणण्यानुसार जर सुप्रीम कोर्टाने शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात टाकली आणि राष्ट्रवादी शरद पवारांकडे सोपवली, तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारणाचे वारे फिरणार आहे. सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे तर राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या ताब्यात. परंतु सरोदे यांच्या म्हणण्यानुसार शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष, अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या ताब्यात गेले तर आगामी विधानसभा निवडणुकीत याचा थेट परिणाम एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर होऊ शकतो.
सध्या महायुतीत एकनाथ शिंदे यांची बाजू भक्कम आहे भाजपाच्या मदतीने ते विधानसभा निवडणुकीत चांगले यश संपादन ही करू शकतात. परंतु अजित पवार मात्र लोकसभा निवडणुकीनंतर बॅकफूटवर गेले असून, भाजपातील एक मोठा गट आणि संघ परिवार त्यांच्या विरोधात उभा ठाकला आहे. अशातच जर पक्ष आणि चिन्ह त्यांच्या हातातून निसटला तर त्यांचे राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह उमटू शकते.