yuva MAharashtra विधानसभेवर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी भाजपची नवी रणनीती, खेळणार नवी खेळी !

विधानसभेवर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी भाजपची नवी रणनीती, खेळणार नवी खेळी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ ऑगस्ट २०२४
लोकसभा निवडणुकीच्यावेळी आलेले अपयश लक्षात घेऊन, विधानसभा निवडणुकीत कोणताही धोका न पत्करता विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी भाजपाने नवी रणनीती आखली आहे. ज्या चुका लोकसभेवेळी झाल्या त्या टाळण्यासाठी विचार करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत इतर घटकांबरोबरच गटबाजीचा फटकाही आहे अनेक उमेदवारांना बसल्याची तक्रार दिल्लीश्वरापर्यंत पोहोचल्याने आता स्थानिक नेत्यांपेक्षा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात देशभरातील नेत्यांना पाचारण करण्यात येणार आहे. 

प्रचारासाठीही पारंपारिक प्रचारा ऐवजी नवे तंत्र अवलंबण्यात येणार आहे. ज्याला 'टूल किट' नावाने संबोधण्यात येणार आहे. यासाठी केवळ विधानसभा मतदारसंघावर फोकस न करता प्रत्येक पंचायत समिती सर्कलवरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजकारणाचा अनुभव असलेल्या छोट्या-मोठ्या नेते व कार्यकर्त्यांना डावलले गेल्याच्या तक्रारी होत्या. आता या अनुभवी व्यक्तींनाही जबाबदारी देण्यात येणार आहे. 'नेत्यापेक्षा कार्यकर्ता हा बेस ठरविण्यात आला आहे.'

निवडणुकीच्या वेळी 'स्थानिक व बाहेरील' हा वाद रंगत असे. आता तर 'आयात' नेत्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांची घुसखोरी मोर्चा प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्यायकारक असल्याची भावना आहे. याला छेद देत, प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी महत्त्वाचा असल्याचा संदेश वरिष्ठांकडून पोहोचवला जाणार आहे. इतकेच नव्हे तर जुना असो वा नवा प्रत्येक कार्यकर्त्याला, महत्त्व देण्यात येणार आहे. यापूर्वी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात स्टार प्रचारकांना प्रचारार्थ उतरवले जायचे. त्यामुळे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्यासाठी कमी वेळ मिळायचा. स्थानिक प्रश्न समजावून घेऊन मतदारांवर प्रभावी भाषण करण्यासाठी वेळ कमी मिळायचा. या सर्व बाबी लक्षात घेऊन, आखणी करण्यात येणार आहे.


दोनच दिवसांपूर्वी नागपूर मध्ये केंद्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, मध्य प्रदेशचे प्रभावी नेते कैलास विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, विश्वास नारंग, खा.  फग्गनसिंह कुलस्ते, तसेच तेथील पक्षाचे संघटन मंत्री हितानंद शर्मा, तेलंगणाचे संघटन मंत्री चंद्रशेखर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीम मधील ऋत्विक मेहता, आणि विदर्भातील आठ महत्त्वाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यामध्ये वरील सर्व बाबींचा सर्वांकष विचार करण्यात आला.

यानंतर आता उद्या मुंबईत पुन्हा एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यावेळी नागपूर येथे झालेल्या बैठकीतील चर्चेचा गोषवारा सादर केला जाणार असून, नव्याने येणारे मुद्द्यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर मतदार संघनिहाय स्टार प्रचारक आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त देण्यात येणाऱ्या नेत्यांची यादी तयार करण्यात येईल.


यापूर्वी निवडणुकीत भाजपच्या दृष्टीने बूथ प्रमुख हा महत्त्वाचा घटक असायचा. यावेळी त्याला समांतर एक वेगळी व्यूहरचना आखण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राजकीय समज पक्की असलेल्या 15 जणांची एक टीम तयार केले जाणार आहे यामध्ये निवडणुका लढण्याचा, त्या जिंकण्याचा अनुभव असलेले स्थानिक नेते आणि इतर जाणकार प्रमुख कार्यकर्ते नेते असतील. एकूण किट क्रमांक 'एक' समजण्यात येईल. या प्रत्येकासाठी एक टूकिट क्रमांक देण्यात येणार आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या टूल किट मध्ये, या 15 पैकी प्रत्येकाने तयार केलेल्या 300 जणांचा समावेश असेल. आणि मग हे तीनशे जण प्रत्येकी दीडशे प्रमाणे 45 हजार जणांची टीम तयार करते ज्यांचा तिसऱ्या क्रमांकाच्या टूल किट मध्ये समावेश असेल. या सर्वांना एका मोबाईल ॲपद्वारे परस्परांशी जोडले जाईल जे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असतील. महत्त्वाचे म्हणजे या सर्व यंत्रणेत महिलांचीही लक्षणीय संख्या असणार आहे.

मुंबईतील बैठकीनंतर आठवड्याभरात ही सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्याचे ध्येय ठरवण्यात आले असून यासाठी एक टीम रात्रंदिवस तयारी करीत आहे. आता हे 'टूलकिट ब्रम्हास्त्र' विरोधकांना ठीक आहे करते, मतदारांशी कशी जवळीक साधते, मतदारांमधील असलेली नाराजी कशी दूर करते, यावर विधानसभेचे यशापयश अवलंबून असणार आहे.