Sangli Samachar

The Janshakti News

शंभर फुटी रस्त्यावर स्पिडब्रेकर आणि धामणी रस्ता रुंदीकरणाची पृथ्वीराज पाटील यांची आग्रही मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑगस्ट २०२४
राजर्षि शाहू महाराज मार्गावर (शंभर फुटी) दुचाकी, चार चाकी, ट्रक व ट्रॅक्टर सारख्या अवजड वाहनांची भरमसाठ संख्या वाढली आहे. वहाने भरधाव वेगाने चालवली जातात. या रस्त्यावर नागरिक, विद्यार्थी, शासकीय कार्यालये व दवाखाने यांच्या सोयीसाठी दुभाजकावर ओपनिंग ठेवले आहेत. तथापि भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे अशा ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत. अपघात टाळण्यासाठी या मार्गावर ओपनिंग समोर दोन्ही बाजूला स्पिडब्रेकर करून पांढरे पट्टे मारावेत.

सांगली - धामणी रस्ता हा अरुंद असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार वहातूक कोंडी होऊन अपघात घडत आहेत. त्यामुळे या मार्गावरील खड्डे मुजवून व रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलावीत अशी आग्रही मागणी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मा. आयुक्त शुभम गुप्ता यांना समक्ष भेटून केली आहे.


तसेच वाहनांची विशेष वर्दळ असलेल्या एम. एस. ई. बी. सबस्टेशनसमोर, पाकिजा मस्जिदसमोर, ग्रीन ताज हाॅटेल समोर व शामरावनगर रस्त्याला जोडणाऱ्या चौकासमोर स्पिडब्रेकर व पांढरे पट्टे मारावेत जेणे करून भरधाव वेगाने धावणाऱ्या वहानावर वेग मर्यादा राहील, अशीही आग्रही मागणी पृथ्वीराज यांनी केली आहे. 

यावेळी अजय देशमुख, शाबाझ नायकवडी, सनी धोतरे, आयुब निशाणदार, प्रफुल्ल यादव, सागर चिखले व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.