| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० ऑगस्ट २०२४
दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदाची माळ अगदी अनपेक्षितपणे माझ्या गळ्यात पडली. खरे तर या पदावर काम करण्याची संधी मला मिळेल असे कधीही वाटले नव्हते. पण श्री. रावसाहेब पाटील यांच्यासारखे मित्र भेटले आणि त्यांच्यामुळेच मला कामाचे प्रोत्साहन मिळाले. असे प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे नूतन अध्यक्ष श्री. भालचंद्र वीरेंद्र पाटील यांनी केले आहे. सांगली येथील प्रतिथयश कर्मवीर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना श्री. भालचंद्र पाटील पुढे म्हणाले की "तुम्ही काम करा आम्ही सोबत आहोत." ही भावना श्री. रावसाहेब पाटील यांनी माझ्यामध्ये निर्माण केली व प्रत्येक ठिकाणी कामाची संधी दिली. माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीला मी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून श्री. भालचंद्र पाटील पुढे म्हणाले की, तरुण वर्गाला शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात येण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे.
कार्यक्रमाचे स्वागत कर्मवीर पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांनी केले. याप्रसंगी बोलताना कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन तसेच दक्षिण भारत जनसभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील म्हणाले की, श्री. भालचंद्र पाटील यांच्याकडे विधायक काम पुढे नेण्याची ताकद आहे. आम्ही बरेच वर्ष एकत्रित काम करून अनेक कामाला मूर्त स्वरूप दिले आहे. दक्षिण भारत जनसभेचे काम समाजाभिमुख करून सर्वसमावेशक केले आहे व समाजाच्या प्रश्नांना सामाजिक व राजकीय पातळीवर न्याय मिळवून देण्याचे कामही केले आहे. तीच परंपरा श्री. भालचंद्र पाटील आणखी पुढे घेऊन जातील असा विश्वास व्यक्त करून श्री. भालचंद्र पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कर्मवीर पतसंस्थेचे संचालक, ॲड. एस पी मगदूम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. रमेश ढबू, श्री. वसंतराव नवले, श्री. ए. के. चौगुले (नाना), डॉ. एस. बी. पाटील (मोटके), डॉ. चेतन पाटील, संचालिका श्रीमती भारतीताई चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र खाडे, श्री. लालासाहेब थोटे आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक सगळे यांनी मानले.