| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १७ ऑगस्ट २०२४
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे श्रेय घेणारे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आता या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या निकृष्ट कामाबाबत गप्प का? पालकमंत्री स्थानिक नगरसेवकांना घाबरतात का ? असा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे.
केंंद्रिय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे २४ कोटींचा निधी मंजूर केला. १७ कोटीला निर्माण कंन्ट्रक्शन कंपनीने या कामाचा ठेका घेतला. निर्माण कंन्स्ट्रक्शनच्या कामाबाबत मिरज सुधार समितीने सुरूवातीपासून साशंकता व्यक्त केली होती. मात्र, पालकमंंत्र्यांनी कोणाला न जुमानता कामास सुरूवात केली. अजूनही ५० टक्के काम होणे आहे.
अवघ्या एका पावसाळ्यात रस्ता पुर्णत: उखडला आहे. १७ कोटींचा निधी या रस्त्यामधील खड्डयात गेला. या रस्त्याचे काम अर्धवट असताना संबधित ठेकेदाराला ९० टक्के रक्कम अदा कशी केली गेली ? उर्वरित ५० टक्के काम कसे पूर्ण होणार... असा प्रश्न मिरज सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी क्रीडांगणासाठी पालकमंत्र्यांनी चार कोटींचा निधी दिला. मात्र, क्रीडांगणाचा तलाव होण्याचे काही थांबले नाही. चार कोटींचा निधी कुठे खर्च झाला हा संशोधनाचा विषय आहे. या दोन्ही प्रश्नांबाबत दहा दिवसांपूर्वी मिरज सुधार समितीने पालकमंत्र्यांची भेटीची वेळ मागितली होती. मात्र, पालकमंत्र्यांकडे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नसल्याने ते सुधार समितीला भेटण्याचे टाळत आहेत.
पालकमंत्री मिरजेतील नगरसेवकांना घाबरतात का ? त्यामुळेच ते गप्प आहेत. अशी मिरज टीका मिरज सुधार समितीने केली आहे. पालकमंत्र्यांनी दोन्ही प्रश्नांची समाधानकारक उत्त्तरे न दिल्यास पालकमंत्र्यांविरोधात "जवाब दो" आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, उपाध्यक्ष नरेश सातपुते, जहीर मुजावर, राजेंद्र झेंडे, रविंद्र बनसोडे, अभिजीत दाणेकर, सलीम खतीब, विजय सालार आदी उपस्थित होते.