yuva MAharashtra सग्यासोयऱ्यांना तर सोडाच, पण मराठ्यांनाही ओबीसीतून आरक्षण नाही - हिंमत असेल तर आठ आमदार निवडून आणा - छगन भुजबळ

सग्यासोयऱ्यांना तर सोडाच, पण मराठ्यांनाही ओबीसीतून आरक्षण नाही - हिंमत असेल तर आठ आमदार निवडून आणा - छगन भुजबळ


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभे आधी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. दोनच दिवसापूर्वी सांगली येथे मनोज जरांगे पाटील यांनी अतिभव्य रॅली समोर भाषण करताना, जीव गेला तरी बेहत्तर पण मराठ्यांना व सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळवून देणारच, अशी भीम गर्जना केली होती. यावेळी उपस्थित असलेल्या लाखोंच्या संख्येतील तरुणा तरुणीची उपस्थिती हा चर्चेचा विषय होता. त्यामुळे कालच्या ओबीसी मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. आणि येथील उपस्थितांची संख्या हा ही चर्चेचा विषय ठरला आहे.

या मेळाव्यात छगन भुजबळ काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष होते. एकेरी भाषेत उल्लेख करीत जरांगे पाटील यांची नक्कल करीत छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे यांनी 288 जागा लढवण्याचे जाहीर केले आहे, परंतु हिंमत असेल तर मैदानात ये 288 जागा लढवण्याबद्दल बोलतो, 88 जागा तरी लढून दाखव आणि आठ जागा तरी जिंकून दाखव असे आव्हानच भुजबळ यांनी यावेळी दिले.


आपल्या घरातील भाषणात भुजबळ म्हणाले की, तो रोज एक नवीन मागणी करतो. कधी म्हणतो सर्व मराठ्यांना कुणबी दाखले द्या, कधी म्हणतो सगेसोयऱ्यांना आरक्षण द्या. परंतु सगेसोयऱ्यांना तर सोडाच, पण मराठ्यांनाही ओबीसी मधून आरक्षण देऊ देणार नाही. चार चार आयोगाने ते शक्य नसल्याचे म्हटले आहे, सर्वोच्च न्यायालयाने हे अशीच टिपणी केली आहे. त्यामुळे तुम्हाला कोणीच ओबीसी मधून आरक्षण देणार नाही असे छगन भुजबळ यांनी ठामपणे सांगितले.

तुम्ही शिवाजी महाराजांचे नाव घेणार आणि हा तेली तो माळगी आमदार आहे असे म्हणून हिणवणार. पण शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधून काढले, त्यांच्यावर पहिला पोवाडा रचला हे त्याला ठाऊक आहे का ? असा सवाल करून छगन भुजबळ यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एक करून मावळे तयार केले. या सर्वांना सोबत घेऊनच या पुढील काळात वाटचाल करावी लागणार आहे, असेही त्याने सांगितले.

प्रकाश आंबेडकरांनी आता ओबीसी बचाव यात्रा सुरू केली आहे. त्यांचाही मनोज जरांगे यांच्या मागण्यांना विरोध आहे. आम्ही त्यांचे स्वागतच करतो असे सांगून भुजबळ म्हणाले की मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखले दिले तर महाराष्ट्रात मराठा समाजात राहणार नाही. ओबीसी समाज हा 54% आहे आम्हाला 27% आरक्षण आहे तेही पूर्ण भरले जात नाही, यातील अवघे साडेनऊ टक्के आरक्षण भरले आहे मग आमचा बॅकलॉग किती आहे ? असा सवाल करून भुजबळ यांनी आवाहन केले की, आधी आमचा बॅकलॉग भरा मग वेगळ्या आरक्षणाचा विचार करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी ओबीसींना धक्का लागणार नाही म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणे शक्य नाही असे भुजबळ यांनी सांगितले. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटले की सगळेच मराठे वाईट नाहीत पण ओबीसींच्या अंगावर येणाऱ्यांना सोडू नका असे आव्हानच छगन भुजबळ यांनी दिले

या ओबीसी बचाव मेळाव्यात विविध वक्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याप्रमाणेच इतर पक्षातील नेत्यांवर आरोप केले. यावेळी संपूर्ण सांगली जिल्ह्यातून ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.