yuva MAharashtra सुखी आणि समाधानी राहणे आवश्यक वाटत असेल तर प्रत्येकाने आपले भाव विश्व सांभाळलेच पाहिजे - डॉ. दिलीप पटवर्धन

सुखी आणि समाधानी राहणे आवश्यक वाटत असेल तर प्रत्येकाने आपले भाव विश्व सांभाळलेच पाहिजे - डॉ. दिलीप पटवर्धन


| सांगली समाचार वृत्त |
खानापूर - दि. २८ ऑगस्ट २०२४
एका बाजूला वाढत चालेला प्रगतीचा वेग तर दुसऱ्या बाजूला माणसाची होत चाललेली ससेहोलपट अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे इथून पुढच्या काळात सुखी आणि समाधानी राहणे आवश्यक वाटत असेल तर प्रत्येकाने आपले भाव विश्व सांभाळलेच पाहिजे, असे प्रतिपादन सांगली येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांनी केले. 

खानापूर तालुक्यातील लेंगरे गावचे सुपुत्र कृषी भूषण दादासाहेब (अण्णा) ठिगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने राज्य कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे कृषिरत्न व सेवार्थी पुरस्काराच्या वितरण कार्यक्रमात जीवन विद्या मिशन मुंबईचे माजी अध्यक्ष तथा सांगली येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन व भारतीय विद्यापीठाचे सहकार्यवाह प्राचार्य डॉ. एम. एस. सगरे यांच्या शुभहस्ते लेंगरे येथील श्रीराम कृष्णाई मंगल कार्यालयात हा दिमागदार कार्यक्रम संपन्न झाला.

उपस्थितांचे स्वागत करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा संजय ठिगळे म्हणाले की, नोकरीच्या निमित्ताने गावापासून व आई-वडिलांपासून दूर असलेल्या लोकांनी गावाशी असलेली नाळ तोडता कामा नये. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. म. शि. सगळे म्हणाले की अलीकडच्या काळात राजा, राणी आणि राजकुमार संस्कृतीमुळे कुटुंब व्यवस्था उध्वस्त होते की काय असे वाटत असतानाच दादासाहेब ठिगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ समाजाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत यातून एक वेगळा आशावाद निर्माण होतो.


याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रम कदम, बंडोपंत राजोपाध्ये, डॉ. सिकंदर जमादार, प्रशांत सावंत, सौ. मालन मोहिते, शारदा शेटे यांनी ठेकळे अण्णांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी गुरुवर्य सुदाम नाना शिंदे व सदाशिव विष्णू मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

शेवटी राजेश ठिगळे यांनी उपस्थित आमचे आभार मानले. सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुहास भैया बाबर, प्राचार्य डॉ. संजय पोरे, ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र पवार, संपतराव पवार, ॲड. सुभाष पाटील, प्रा. श्रीकृष्ण मोहिते, श्रीरंग शिंदे त्याचप्रमाणे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.