yuva MAharashtra "समाजाला ग्लानी मध्ये ठेवून सर्वांना नियंत्रणात ठेवण्याचे कारस्थान" - भारत सासणे

"समाजाला ग्लानी मध्ये ठेवून सर्वांना नियंत्रणात ठेवण्याचे कारस्थान" - भारत सासणे


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १७ ऑगस्ट २०२४
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे येथे आज झाले 'नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी' या मालिकेतील १५ पुस्तिकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, अंनिस ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, संपादक, प्राचार्य डॉ. अरूण आंधळे, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे तसेच अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, मिलिंद देशमुख हे सर्व उपस्थित होते. 

भारत सासणे म्हणाले, "डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी त्यांचे अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम मानवतावाद, विवेकवाद पर्यंत आणून ठेवले आहे. समाजाला ग्लानीमध्ये ठेवून त्यांना आज्ञाधारी बनवून आपल्या नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. वेगळ्या पद्धतीने विचार करू नये असे शिक्षणाचे धोरण बनवण्यासाठी प्रतिगामी शक्ती सक्रिय आहेत. बालवयात आणि तरुण वयात होणारे संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत आणि अंनिसने प्रकाशित केलेली या १५ पुस्तिका कामाला येतील. त्यामुळे ' नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी ' हे अभियान महत्त्वाचे आहे. 


प्रतापराव पवार म्हणाले, "आपण आपल्या गौरवशाली इतिहासाचा वारसा सांगतो. अर्वाचीन काळापासून आपल्याकडे धान्य उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. पण आपण ज्ञानात गुंतवणूक न केल्याने आणि जाती व्यवस्था कर्मकांड मध्ये अडकून राहिल्याने आपल्याकडे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास झाला नाही. डॉ. दाभोलकर यांनी लोकशिक्षण या एकमेव मार्गाचा अवलंब करून त्याद्वारे वैज्ञानिक वृत्ती पसरवण्याचे काम केले. त्याचाच धागा पुढे नेऊन त्यामुळे संशोधनात आपण गुंतवणूक केली पाहिजे."

डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, "मुलांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचे बीज रुजले पाहिजे. ज्या कुटुंबात विवेकी विचार रुजतो त्या घरात नक्कीच प्रगतिशील वातावरण तयार होते आणि तेच याठिकाणी जमलेल्या लोकांच्या निमित्ताने दिसून येते. त्यामुळे सत्यशोधक विचारांची परंपरा असलेल्या रयत शिक्षण संस्थेत रॅशनल थिंकींग सेल आणि सायको सोशिओ कौन्सलिंग सेलच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचे काम पुढे जाईल अशी आशा आहे."

विनोद शिरसाठ म्हणाले, "मराठी साहित्यात मारुती चितमपल्ली आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेलं साहित्य हे अद्वितीय आहे कारण दोघानी त्यांनी केलेल्या लिखाणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षांत या दोघांचे लिखाण सर्व इतर भारतीय भाषांत आणि जगातील सुद्धा भाषांत जाईल आणि सर्वांचे प्रबोधन केले. या सर्व पुस्तकांत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची सर्व मूल्ये, निर्भयता, निती, वैज्ञानिक दृष्टिकोन हे सर्व व्यक्त होतात."

प्राचार्य आंधळे यांनी स्वागत आणि प्रास्तविक केले. महाविद्यालयाच्या सायको सोशल सेल चे सविता पाटील यावेळी उपस्थित होत्या. प्रा. सायली गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. 

आज ज्या पुस्तकांचे प्रकाशन झाले त्यातील काही पुस्तिका अशा आहेत : अंगात येणे, भ्रामक वास्तू (श्रद्धा) शास्त्र, बुवाबजीचे घातक जाळे, कर्मकांडाचे मायाजाल, ग्रेट भेट डॉ. नरेंद्र दाभोलकर, विवेकसाथी नरेंद्र दाभोलकर, माझा न संपणारा प्रवास, लढा शनिशिंगनापुरचा, सत्यशोधक विवाह, खेळाचे मानसशास्त्र, नवसाच्या पशुहत्येचा गळफास, श्रद्धा अंधश्रद्धा/ वाद प्रतिवाद, भुताचे झपाटणे ई