yuva MAharashtra कर्नाळ नांद्रे परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन, नागरिकात भीती, वनविभागाची गस्त सुरू !

कर्नाळ नांद्रे परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन, नागरिकात भीती, वनविभागाची गस्त सुरू !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ ऑगस्ट २०२४
आपला नैसर्गिक अधिवास सोडून बिबट्यासह इतर अनेक वन्य प्राण्यांचे नागरी वस्तीत नेहमीच दर्शन होत असते. यामध्ये बिबट्या व गवारेडा यांचे प्रमाण जास्त असते. कुठे ना कुठेतरी बिबट्या व गवा नागरिकांना दिसत असतो. यानंतर वनविभागाला कळविले जाते व संबंधित वन्यप्राण्याला पकडून सुरक्षितपणे त्याच्या आदिवासात सोडले जाते. कर्नाळ नांद्रे रोड हाही असाच नियमितपणे गवा अथवा बिबट्याचे दर्शन घडविणारा मार्ग म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकताच कर्नाळ नांगरे परिसरातील ओढ्यालगत काही नागरिकांना बिबट्या पहावयास मिळाला. काहींनी त्याचे मोबाईलवर शूटिंग ही केले. ही माहिती तात्काळ वन विभागाला कळविण्यात आल्यानंतर त्यांचे पथक तातडीने या भागात दाखल झाले व बिबट्याचा शोध सुरू झाला. परंतु रात्री उशिरापर्यंत बिबट्या सापडला नाही. त्यामुळे आज पुन्हा बिबट्याचा शोध घेण्यात येणार आहे. दरम्यान नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा वनविभागाकडून देण्यात आला आहे. विशेषतः रात्री शेतामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांनी बाळगावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.


वनविभागाप्रमाणेच हा व्हिडिओ व्हायरल होताच प्राणी मित्रांनी ही या भागात धाव घेतली. येथे बिबट्याच्या पावलांचा आदमास घेताना हा बिबट्या नावरसवाडीच्या दिशेने गेल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वनविभागाबरोबरच माजी मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांच्यासह त्यांच्या टीमनेही घटनास्थळाची पाहणी केली. 

नागरिकांना अशाप्रकारे वन्यजीव आढळून आल्यास 1926 या टोल फ्री क्रमांक वर माहिती द्यावी त्या प्राण्याच्या जवळ जाण्याचा अथवा त्याला उचकवण्याचा प्रयत्न नागरिकांनी करू नये असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून हा बिबट्या परिसरात दिसून येत आहे तो वयाने दोन-तीन वर्षाचा असण्याची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन माजी मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनीही केले आहे.