| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ ऑगस्ट २०२४
भाजपचं राजकारण अत्यंत घाणेरडं आहे. संसदेत ओरडल्याशिवाय मुद्दाच मांडू देत नाहीत. पण तुमचा विषय मांडण्यासाठी, तुमची काम करण्यासाठी रोज मिठाच्या गुळण्या करून तुमचा आवाज बनून, तुमचे प्रश्न तिथं मांडेन असा निर्धार खा. विशाल दादा पाटील यांनी जत तालुक्यातील निगडी येथे संपन्न झालेल्या बंजारा समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.
यावेळी बोलताना खा. विशालदादा पाटील म्हणाले की, तुमचा सर्वांचा आवाज बनून मी संसदेत गेलो आहे, तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमताने काँग्रेस पक्षाच्या विचाराचे सरकार महाराष्ट्रात येईल, आणि या विचारांना साथ देणारा विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासारखा कर्तृत्ववान नेता येथून पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून यायला हवा अशी अपेक्षा, खा. विशाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना माजी मंत्री व काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, आज पर्यंत आपल्या तालुक्याला जी दुष्काळाची नजर लागली आहे, ती हटवण्याचे काम आम्ही सर्वजण एकत्रित येऊन करू. बंजारा समाजाच्या प्रश्नाबाबत बोलताना डॉ. कदम म्हणाले की, आज तुमचे प्रश्न घेऊन राज्यभरातून येथे आलेला आहात. बंजारा समाजाचे नेते आमदार राजेश राठोड यांनी यावेळी बंजारा समाजाचे अनेक प्रश्न मांडले. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पूर्ण बहुमताने काँग्रेस पक्षाच्या विचाराचे सरकार येणार आहे, त्यामुळे तुमचे सर्व प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही करू, असा विश्वास डॉ. विश्वजीत कदम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
या मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यभरातून हजारो बंजारा समाज एकत्रित झालेला होता. यावेळी खा. विशाल पाटील, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. राजेश राठोड, आ. विक्रमसिंह सावंत यांच्यासह जत तालुक्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.