Sangli Samachar

The Janshakti News

राज्यभर 'महिला हरिपाठ मंडळां'ची स्थापना करणार ! - मालुश्री पाटील, राज्य अध्यक्षा, वारकरी साहित्य परिषद

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ ऑगस्ट २०२४
कुटुंबाच्या सुधारणेत महिलांचा मोलाचा वाटा असतो. एक सुशिक्षित महिला आपल्या कुटुंबाला प्रगतीपथावर नेण्यासाठी ज्याप्रमाणे महत्त्वाचे भूमिका बजावत असते, त्याचप्रमाणे एक सुसंस्कृत महिला आपल्या कुटुंबाला संस्कारातून एक आदर्श कुटुंब बनवू शकते. आणि म्हणूनच वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने 'संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळे' स्थापन करण्याचा निर्णय व त्यानिमित्ताने प्रबोधनासह सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा मालुश्रीताई पाटील आणि परिषदेचे संस्थापक विठ्ठल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत माहिती देताना मालुश्रीताई पाटील म्हणाल्या की, महिलांना शारीरिक व्यायाम आणि बौद्धिक चालना देण्याचा या निमित्ताने प्रयत्न करण्यात येणार आहे. घरातील मुला-मुलींवर चारित्र्याचे संस्कार, व्यसनमुक्ती हा आहे यामागील उद्देश आहे. पुरुषांना विरंगुळ्याचे अनेक ठिकाणी असतात पण महिलांना मर्यादा असते. हरिपाठ मंडळाच्या निमित्ताने महिलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळेल. त्यामुळे एक महिला सुसंस्कृत झाली तर एक घर सुसंस्कृत होण्यास मदत होणार आहे.


यावेळी बोलताना विठ्ठल पाटील म्हणाले की, गेल्या काही महिन्यात राज्यातील 36 जिल्ह्यात मोठ्या संख्येने मंडळ स्थापन करण्यात आली आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, अकोला, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात सध्या मंडळे कार्यरत असून इतर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यात येत आहे. मंडळाच्या महिलांना हरीपाठाच्या पुस्तिका, गणवेश व टाळ देण्यात येणार आहेत. कुटुंबांमध्ये संतांचे विचार रुजू व्हावेत, त्यातून सामाजिक स्वास्थ्य राखले जावे, असा या उपक्रमामध्ये उद्देश आहे. गाव तेथे मंडळ तसेच नगरपालिका क्षेत्रात प्रभाग देते मंडळ चालू करण्यात येणार आहे मातृभाषेतूनच शिक्षण प्रसार हे यातील महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सभासद महिलांमध्ये याची गोडी लागावी म्हणून विविध स्पर्धा व खेळांचे हे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल पाटील यांनी यावेळी दिली.