Sangli Samachar

The Janshakti News

अरबी समुद्राखालील सात किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून ताशी 320 किमी वेगाने धावणार रेल्वे !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ ऑगस्ट २०२४
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी वेगवान संपर्क निर्माण व्हावा, म्हणून अनेक मार्ग तयार करण्यात येत आहेत. यापैकीच एक म्हणजे समृद्धी महामार्ग तर दुसरा चर्चेत असलेला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा. समृद्धी मार्गावरून यापूर्वीच वाहतुकीने वेग घेतला आहे. प्रतीक्षा आहे ते मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाची. आणि यातीलच महत्त्वकांक्षी बोगदा अरबी समुद्र खालून तयार करण्यात येत आहे. यासाठी टनेल बोअरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड यांचा वापर केला जाणार आहे. परदेशात सर्वाधिक वापरली जाणारी ही पद्धत आता भारतातही वापरले जात असल्याने, वाहतूकीला नवा वेग प्राप्त होत आहे.

सध्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॅरेटोर तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशन या 508 किलोमीटर लांब मार्गाचे काम करीत आहे. त्यापैकी एकवीस किलोमीटरचा मार्ग जमिनीखालील जाणार असून तो भाग अरबी समुद्राखाली असल्याने येथे अत्याधुनिक पद्धतीने बोगदा तयार केला जात आहे. अशा पद्धतीने बांधण्यात येणारा हा समुद्राखालील पहिलाच बोगदा आहे. या बोगद्याची खोली जमिनीखाली 25 ते 65 मीटर इतके असेल यासाठी अजस्र अशा मशीनचा वापर करण्यात येणार आहे.


सध्या घणसोली, शिळफाटा आणि विक्रोळी भागात या बोगद्याचे काम सुरू करण्यासाठी खोदकाम केले जात आहे, या वर्षाअखेरीपर्यंत पहिल्या टनेलचे काम बोअरिंग मशीन द्वारे सुरू होईल असा अंदाज आहे. जमिनीखालील मार्ग तयार करणे हे आव्हानात्मक काम असून यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. समुद्राखालील हा सिंगल ट्यूब बोगदा असून त्यामध्ये बुलेट ट्रेन ला येण्या जाण्यासाठी दोन ट्रक असतील. ज्या मार्गावरून 320 किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन धावेल. 

याबाबत संबंधित प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, बुलेट ट्रेनचा 21 किलोमीटरचा भुयारी मार्ग महाराष्ट्रातल्या वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सपासून ते शिळफाट्यापर्यंत बनवला जातो आहे. ठाणे क्रीक झोनमध्ये (इंटरटायडल झोन) समुद्राच्या खाली 7 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाईल. एकूण 21 किलोमीटरपैकी 16 किलोमीटरच्या मार्गाचं खोदकाम करण्यासाठी 13.1 मीटर व्यासाच्या कटर हेड लावलेल्या टनेल बोअरिंग मशीनचा वापर केला जाईल. मेट्रोसाठीचा बोगदा तयार करण्यासाठी 5-6 मीटर व्यासाच्या कटर हेडचा वापर केला जातो. 16 किलोमीटरच्या मार्गात खोदकाम करण्यासाठी तीन टनेल बोअरिंग मशीनचा वापर केला जाणार आहे. उरलेल्या पाच किलोमीटर मार्गाचं खोदकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडनं केलं जाईल.