| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑगस्ट २०२४
मराठा आरक्षणासाठी पक्ष व नेत्यांना बाजूला ठेवून, समाजाने सर्वच पक्षांचे 288 आमदार पाडा, यासाठी समाजाने एकजूट दाखवावी असे आव्हान सांगली येथील जाहीर सभेत बोलताना मराठ्यांनी नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. सांगली येथील राम मंदिर चौकात झालेल्या अति भव्य रॅलीला संबोधन करताना ते बोलत होते.
सरकार आरक्षण द्यायला तयार नाही त्यामुळे आता मराठ्यांना रग आणि धग दाखवायची वेळ आली आहे असे सांगून मनोज जरांगे म्हणाले की, आतापर्यंत आपण पक्ष आणि नेत्याला मोठे केले. तुमची लढाई तुम्हाला अंगावर घ्यावी लागेल. आरक्षण न दिल्यास 288 आमदार तुमचे नाहीत, ते पाडायचे आहेत. समाजाचे एकास एक उमेदवार देऊन 288 आमदार पाडू. त्यासाठी पक्ष आणि नेत्याला बाजूला ठेवून जातीसाठी जोर दाखवा. तर पूर्वी आरक्षण द्या अन्यथा सत्ता घुसून घेऊ असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते म्हणून जरांगे पाटील यांनी दिला. यासाठी 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत यायचे असून देशातील सर्वात मोठे बैठक या ठिकाणी होईल त्याला उपस्थित राहण्याचे आव्हाने हे जरांगे पाटील यांनी यावेळी केल्या.
सांगलीतील राम मंदिर चौकात मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता यात्रेच्या निमित्ताने जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. तत्पूर्वी विश्रामबाग ते रामनगर चौक अशी शांतता रॅली काढण्यात आली या दरम्यान मनोज जरांगे यांनी विश्रामबाग चौकातील क्रांतिवीर नाना पाटील यांच्या पुतळ्यास, त्यानंतर पुष्कराज चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील आणि साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास बहार अर्पण केले.
यावेळी बोलताना जरांगे पाटील पुढे म्हणाले की आता अर्धे अधिक पक्ष बंद करायची वेळ आली आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. आरक्षण म्हणजे त्यांच्या बापाची जहांगिरी नाही. माझा संघर्ष मराठा समाजातील लेकरे मोठे करण्यासाठी आहे. यांना केवळ त्यांचे पक्ष आणि त्यांची मुले मोठे करायची आहेत. त्यांनी पक्ष मोठे केले, मुले मोठे केली. मात्र आरक्षणाबाबत कोणी बोलत नाही. केवळ आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पक्षातील लोकांनी मराठी समाजाच्या बाजूने बोलावे, आम्हाला राजकारणात जायचे नाही. जर आरक्षण दिले नाही, तर आम्हाला पर्याय नाही. पण ते त्यांच्या छाताडावर बसून आम्ही आरक्षण घेऊ असे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले.
जागी राहा आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आता मागे सरकायचं नाही क्षत्रियाचा धर्म आहे विजय झाल्याशिवाय मागे फिरायचं नाही एकदा लढाई जिंकायची आणि विजयाचा टिळा लावून मगच मागे यायचं. पुढच्याची जिरवल्याशिवाय आपण मागे फिरायचे नाही. आता या नेत्यांची मुले नाहीत, तर सामान्य मराठा कुटुंबातील मुलगा आमदार होईल, आता गाफील राहू नका उमेदवारी द्यायची ठरली तर विरोध करायचा नाही. त्याच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांना राजकारणाचा नाद लय बेक्कार कोणीही उठते आणि माझ्याकडे उमेदवारी मागते. एकाच गाडीतून चार चार जण माझ्याकडे येतात आणि उमेदवारी मागतात हे बरोबर नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
एका छगन भुजबळ ने विधानसभेत आवाज उठवला मात्र आपल्या कोणीही आवाज काढला नाही. आपला बोलणारा हक्काचा माणूस नाही. मी रस्त्यावर लढायला तयार आहे, तुम्ही विधानसभेत 50 जरी गेलात तरी त्यांचा कार्यक्रम होईल, असे सांगून जरांगे पाटील म्हणाले की, सगळ्या पक्षातील मराठी लोकांनी एकदा ठरवा. आरक्षण द्या आणि तुम्हाला कोणत्या पक्षात जायचे तेथे जावा. तुम्ही भावनिक होऊ नका, छगन भुजबळला मी पुरून उरेल. देवेंद्र फडणवीस भुजबळ यांना ज्या ज्या गावात घेऊन जाईल, तेथील आमदार आपण पाडायचा. सांगलीत खूप मोठी आग आहे. विधानसभेला यांचा बुक्का पाडा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
आता आपण मुंबईला गेलो तर त्यांना मुंबईतून बाहेर पडावे लागेल. तुमच्यात काही मतभेद असतील तर ते मिटवा. मराठा मराठ्यातच भांडत बसू नका. ज्यांना आरक्षण आहे ते ताकतीने भांडत आहेत, मराठ्यांनी व्यसनापासून लांब राहून जगाच्या पाठीवर प्रगत असणारी जात मराठ्यांची असल्याचे दाखवून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मनोज जरांगे पाटील यांची सभा सुरू होण्यापूर्वी मुसळधार पाऊस झाला. परंतु या भर पावसातही मराठा समाजातील तरुण-तरुणी जागचे हलले नाहीत. या सभेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून हजारो तरुण-तरुणी उपस्थित होते यामध्ये महिलांची ही संख्या लक्षणीय होती. पोलीस आणि मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी अतिशय सुरेख नियोजन केले होते. कोणताही गदारोळ न होता ही सभा संपन्न झाली.