Sangli Samachar

The Janshakti News

'चंदा मामा दूर के |'... जाणार आता अधिकच दूर... दिवस होणार 25 तासांचा !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ ऑगस्ट २०२४
चंदा मामा दूर के पुये पकाये बुर के, आप खाये थाली मे मुन्ने को दे प्याली मे |... 1955 साली आलेल्या वचन या चित्रपटातील हे गाणे... किंवा मग... चांदोमामा चांदोमामा भागलास का, निंबोणीच्या झाडाच्या मागे लपलास का ? हे गाणे... अथवा निंबोणीच्या झाडामागे चंद्र लपला ग बाई, हे 1975 साली आलेल्या बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गाणं... चंद्र आणि आपला संबंध हा असा बालपणापासून आलेला... तसा तो आपल्या जन्मपत्रिकेतही सामावलेला... वरील गाण्यांच्या चालीप्रमाणे जन्मपत्रिकेतील त्याच्या चालीवरच तर आपल्या आयुष्याच्या सुखदुःखाच्या रेषा बोलत असतात... प्रेमिकांना तर हा चंद्र खूपच जवळचा... लेखक आणि कवी यांच्यासाठी हा हक्काचा... इतकेच नव्हे तर संशोधकांच्या दृष्टीनेही हा खूप महत्त्वाचा... पण हा चंद्र आता आपल्यापासून दूर जातो आहे असं सांगितलं तर ?

विस्कॉन्सिंन मॅडिसन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. शास्त्रज्ञांच्या मते चंद्र हा पृथ्वीपासून दूर चालला आहे आणि त्यामुळे भविष्यात दिवस हा 25 तासांचा होऊ शकतो असं त्यांचे म्हणणे आहे. या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी जवळपास 3. 8 सेंटीमीटर इतके अंतर दूर जात आहे यामुळे पृथ्वीवरील दिवसाचा कालावधी वाढून 24 तासांच्या ऐवजी तो 25 तास होऊ शकतो. 1. 4 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरील दिवस हा 18 तासांचा होता. आणि जसं जसा चंद्र दूर जाईल तसतसा पृथ्वीवरील दिवसांचा कालावधी वाढत चालला आहे.


पृथ्वी आणि इतर सर्वच ग्रहांच्या बाबतीत शास्त्रज्ञ नेहमीच संशोधन करीत असतात. यातून अनेक महत्त्वाची माहिती मानवासाठी खूप उपयोगाची ठरत असते. आता चंद्र दूर गेल्याने आणि पृथ्वीवरील तास वाढल्याने जगभरातील घड्याळे आणि वेळ यांच्याशी संबंधित सर्व परिमाणे बदलावी लागणार आहेत. रिंग लेझरच्या माध्यमातून पृथ्वीच्या परिभ्रमणाचा पॅटर्न आणि वेग मोजण्यात येतो. हे परिमाण इतके अचूक काम करते की पृथ्वीच्या हालचालीतील अगदी लहानात लहान बदल सुद्धा लक्षात येतात.

आता शास्त्रज्ञांच्या या संशोधनानुसार दिवस 25 तासांचा कधी होईल ?... तर तो मोजण्यासाठी आपण असणार नाही आहोत, कारण हा कालावधी जवळपास 20 कोटी वर्षानंतरचा असू शकतो. आणि त्यावेळी चंद्राच्या परिभ्रमणामुळे जे काही फेरबदल पृथ्वीवर आणि मानवावर होतील, ते पाहण्यासाठी तेव्हाचे शास्त्रज्ञ तत्कालीन उपकरणांचा वापर करून उपाय शोधतील... त्यामुळे आपण निर्धारस्थ राहू या... 
नाही का ?...