Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील पारस मनोज पाटील याच्या शोध निबंधास "रेस्पायर 2024" मध्ये रौप्य पदक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ ऑगस्ट २०२४
येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी पारस मनोज पाटील (MBBS तृतीय वर्ष) याने मेडिकल विद्यार्थ्यांमध्ये टेक्स्ट नेक सिंड्रोम किती प्रमाणात आहे याचा अभ्यास करून एक शोध निबंध सादर केला. "रेस्पायर 2024" या बी.जे. मेडिकल पुणे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्याला रोप्य पदक प्राप्त झाल्याने पारस पाटील याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आज-काल सर्वत्र आढळणाऱ्या आणि साथीच्या रोगाप्रमाणे वाढणाऱ्या या समस्येचे वास्तव समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा होत आहे आणि ही चर्चा होणे आवश्यक आहे.

"टेक्स्ट नेक सिंड्रोम" ही एक अशी परिस्थिती आहे की, ज्यामध्ये मोबाईल, टॅबलेट आणि इतर साधनांकडे खाली पाहत राहणे. यामुळे मानेचे स्नायू, कन्डरा आणि मणके यांच्यावर खूप ताण येतो. त्यामुळे मानदुखी, खांदेदुखी, डोकेदुखी, पाठीचा वरचा भाग दुखणे आणि मानेची मर्यादित हालचाल यासारख्या समस्या निर्माण होतात. पुढे जाऊन मानेची चकती बाहेर येणे, चेतातंतू दबले जाणे, स्नायूंची शक्ती कमीजास्त होणे या गंभीर स्वरूपाच्या समस्या निर्माण होतात.

मोबाईलच्या व्यतिरिक्त आरामदायी जीवनशैली, स्थूलता चुकीची बैठक पद्धती या आजाराची कारणे आहेत. परंतु सोशल मीडिया, स्मार्टफोन आणि टॅबलेटचा वापर, 'वर्क फ्रॉम होम'चे कल्चर यामुळे या आजाराची व्याप्ती खूप वाढत आहे असे दिसून आले आहे.




विविध महाविद्यालय कॅम्पेसेस मधील 233 विद्यार्थ्यांचा अभ्यास करून हा शोधनिबंध तयार करण्यात आला आहे. पहिल्या वर्षापासून इंटरनशिप करणारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा यात विचार करण्यात आला आहे. परंतु ज्यांना जन्मजात व्याधी आहे अथवा ज्यांचे मानेचे ऑपरेशन झाले आहे त्यांचा यात समावेश केलेला नाही.

मानेच्या समस्यांचे एक ते पाच ग्रेडमध्ये विभाजन केले आहे, तर स्मार्टफोनच्या वापराच्या दहा प्रश्नांच्या आधारे एक ते सहा असे ग्रेड्स बनवण्यात आले आहेत. या आधारावर हे सहा ग्रेड्स तयार केले आहेत.


त्याची निरीक्षणे खालील प्रमाणे आहेत....
1. 74 टक्के विद्यार्थ्यांना मानेच्या समस्या आहेत ज्यांचे सरासरी वय केवळ 21 वर्ष आहे.
2. मानेच्या समस्या असलेल्या विद्यार्थ्यांपैकी
48% विद्यार्थ्यांना सोशल मीडिया एडिक्शन आहे. म्हणजे ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेले आहे.
3. पाठीचे दुखणे आणि मानेचे दुखणे तसेच मानेचे आखडणे ही सर्व लक्षणे या 48% विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळत आहेत
4. मोबाईल फोनचा विद्यार्थ्यांमधला वापर पाहता 83 टक्के मुले ई लर्निंगसाठी, 67% मुले व्हाट्सअप, इंस्टाग्राम स्क्रोलिंग करण्यासाठी /रील पाहण्यासाठी आणि 67% मुले चित्रपट पाहण्यासाठी वापर करतात.
5. एकूण विद्यार्थ्यांपैकी 40 टक्क्याहून जास्त मुले सहा तासांपेक्षा जास्त दर दिवशी मोबाईलचा वापर करतात.
6. एकूण विद्यार्थ्यांपैकी 88% मुले झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करतच असतात. त्यामुळे त्यांचे झोपेची वेळ ही कमी होत आहे.त्याचेही वेगवेगळे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत.
6. मोबाईल पाहत असताना 90% हून अधिक विद्यार्थ्यांचा मानेचा कोण हा 15 ते 45 डिग्री इतका असतो.
7. एकदा फोन कडे पाहायला सुरू केले कालावधी 15 ते 30 मिनिटांपर्यंत वाढतो असे 62% विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडते.
8. 45% हून अधिक विद्यार्थी तीन तासापेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतात. तर 34% विद्यार्थी पाच तासापर्यंतचा वेळ सोशल मीडियावर घालवतात.
9. सर्व गोष्टींचा अभ्यास पाहता मुली आणि मुले यांच्यामध्ये फारसा फरक आढळत नाही.
10.SAS-SV च्या आधारे अभ्यास केला असता "टेक्स्ट नेक्स्ट सिंड्रोम' आणि स्मार्टफोन चा वापर याचा स्पष्ट संबंध दिसून येतो. BSMAS च्या आधारे मूल्यांकन केले असता," मानेच्या समस्या मोबाईल फोन ने वाढल्या आहेत" असे दिसून येते.

वरील सर्व परीक्षणावरून असे लक्षात येते...
21 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांमध्ये खरे तर " टेक्स्ट नेक्स्ट सिंड्रोम" हा आढळून यायला नको आहे. परंतु मोबाईलच्या वापरामुळे तो दिसून येऊ लागला आहे आणि ते प्रमाण 73 टक्के इतके आहे. हे खूपच आहे!काळजी घ्यायला हवी.


1. चित्रांमध्ये दाखवल्याप्रमाणे आपली बसण्याची पद्धत असावी.
2. नियमितपणे मानेच्या स्नायूंना शक्ती प्राप्त होईल अशा प्रकारचे व्यायाम करावेत.
3. आपले वजन मर्यादेमध्ये राहील याची काळजी घ्यायला हवी.
4. अपरिहार्य असेल तेव्हा आपल्या स्क्रीन टाईम च्या दरम्यान वरचेवर विश्रांती घ्यायला हवी.
5. सोशल मीडियाच्या वापराबाबत आपण चोखंदळ आणि संयमी राहायला हवे.