yuva MAharashtra व्हॅट चुकवल्याने सांगलीतील दोघा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल, जवळपास 15 कोटीची रक्कम !

व्हॅट चुकवल्याने सांगलीतील दोघा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल, जवळपास 15 कोटीची रक्कम !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ ऑगस्ट २०२४
कुपवाड एमआयडीसीतील नवमहाराष्ट्र चाकण ऑईल मिलने तब्बल 14 कोटी 79 लाख 18 हजार 52 रुपयांचा मूल्यावर्धित कर अर्थात व्हॅट चुकवण्याचा प्रकार घडल्याने याबाबत नवमहाराष्ट्र चाकणचे व्यापारी योगेश नरसुदास शेठ (रा. सिप्ला फाउंडेशनजवळ, वारजे, पुणे) आणि मदन मोतीलाल बोरा (रा. नवमहाराष्ट्र हाऊस, शनिवार पेठ, पुणे) या दोघांविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राज्य कर निरीक्षक वैभव माने यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.


योगेश शेठ व मदन बोरा यांचा पशुखाद्य, खाद्यतेल, सरकी पेंड आदी वस्तूंचे उत्पादन व विक्रीचा व्यवसाय आहे. कुपवाड एमआयडीसी मधील नवमहाराष्ट्र चाकण ऑईल मिल येथे या वस्तू उत्पादित केल्या जातात. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा 2002 नुसार त्यांच्या व्यवसायाची नोंद करण्यात आली आहे. दिनांक 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2017 मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट तसेच त्यावरील व्याज, शास्ती भरली गेली नव्हती.

थकीत व्हॅट भरण्यासाठी नऊ महाराष्ट्र चाकणचे योगेश शेठ यांना दिनांक 22 फेब्रुवारी व दिनांक नऊ जुलै 2014 रोजी आणि मदन बोरा यांना दिनांक 24 जुलै 2024 रोजी नोटीस पाठवण्यात आली होती तरीही त्यांनी कर भरणा केला नाही. त्यामुळे व्हॅट कायद्यातील कलमानुसार त्यांना ई-मेल द्वारा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या दोघांनीही नोटीसला कोणतेही उत्तर दिले नव्हते. याची दखल घेत सांगलीचे राज्य कर उपायुक्तांच्या आदेशानुसार निरीक्षक वैभव माने यांनी या दोघा विरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे मध्ये फिर्याद दिली. दिनांक एक एप्रिल 2013 ते दिनांक 31 मार्च 2017 या कालावधीत 14 कोटी 19 लाख 18 हजार 52 रुपयांचा व्हॅट चुकवल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला असून कुपवाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.