| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० ऑगस्ट २०२४
चारित्र्य चक्रवर्ती, समाधीसम्राट, प्रथमाचार्य प. पू. 108 श्री शांतीसागर महाराज यांची 69 वी पुण्यतिथी आचार्य पदारोहण शताब्दी वर्षाच्या पर्वावर शुभ स्थान समडोळी (ता. मिरज जि. सांगली) येथे दक्षिण भारत जैन सभेच्या वीर सेवा दल मध्यवर्ती समितीमार्फत दि 5 सप्टेंबर 2024 रोजी मोठ्या श्रद्धा व भक्तीपूर्वक वातावरणात संपन्न होत आहे.
प्रथम आचार्य चारित्र्य चक्रवर्ती समाधीसम्राट प. पू. 108 श्री शांतीसागर महाराज यांचे पावन पवित्र स्मृती चिंतन, अभिवादन करण्याबरोबरच त्यांना अभिप्रेत अशा चरित्र, चारित्र्य, संस्कार, अहिंसा, त्याग, तपस्या, संयम यासारख्या सदविचाराचे समाजात अभिसरण व्हावे, त्यांच्या आदेश उपदेशाचा प्रचार प्रसार व्हावा, त्यांच्या अलौकिक चिरंजीव आचार विचाराचे त्यांच्या कार्यकर्तुत्वाची माहिती समाजाच्या सर्व स्तरावर पोहोचावी यासाठी या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन द. भा. जैन सभेच्या वीर सेवा दलाकडून होणार आहे.
या पुण्यतिथीच्या समारोहासाठी सप्तम पट्टाधिश पपू आचार्य 108 श्री अनेकांत सागरजी महाराज यांचे पावन सानिध्य व मुख्य मार्गदर्शन व संयममूर्ती प. पू. आचार्य श्री 108 वर्धमान सागरजी महाराज यांच्या मंगल सानिध्या व आशीर्वाचनाने होणार आहे. त्याचप्रमाणे दोन्ही संघर्ष सर्व त्यागी मुनींच्या, तसेच प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी, नांदणी व स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, कोल्हापूर यांचेही पावन सानिध्या यानिमित्ताने लाभणार आहे.
आचार्यश्रींची पुण्यतिथी केवळ धार्मिक स्तरावरून साजरे न करता तिला सामाजिक आशय देत, धर्म संस्कार शिबिर, महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, शिबिर असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अहिंसा, व्यसनमुक्ती, शाकाहार, राष्ट्रीय एकात्मता, शांती सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. यामध्ये वीर सेवा दलाचे हजारो स्वयंसेवक, कार्यकर्ते, विविध शाखा मधून आलेले सेवा दलाच्या वीर सैनिकांकडून पथनाट्य सादर करण्यात येणार आहेत, सामाजिक विषय व आशय असणारे राष्ट्रीय संदेश देणारे देखावे, वाद्य पथक यांचाही समावेश असणार आहे.
यावर्षी आचार्यश्रींची 69 वी पुण्यतिथी दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी, शुभ स्थान संगोळी येथे मोठ्या प्रमाणात संपन्न होणार असून या मंगलदिनी त्यांच्या सल्लेखना स्थळी सकाळी 6.55 वाजता शांतीद्वीप प्रज्वलन, विश्वशांती प्रार्थना, अंतिम आदेश उपदेशाचा स्वाध्याय होणार आहे. शांतीकलश रथ प्रवर्तन शांती सद्भावना रॅलीसह मुख्य कार्यक्रम दु. एक वाजता संपन्न होणार असून मुख्य समारंभासाठी त्यागी, मुनी, लोकप्रतिनिधी, यासह सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातून सुमारे पन्नास हजाराहून अधिक श्रावक श्राविका उपस्थित राहणार आहेत.
या मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील हे भूषवणार असून, समारोहाचे स्वागताध्यक्ष वीर सेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील हे आहेत. या कार्यक्रमास दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील, माधव डोर्ले, डॉ. अजित पाटील, संजय शेटे, अरविंद मजलेकर यांच्यासह समाजातील प्रमुख व्यक्तींची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
वीर सेवा दल मध्यवर्ती समिती, दिगंबर जैन समाज, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ शाखा संगोळी यांच्या वतीने संपन्न होणाऱ्या या पुण्यतिथी महोत्सवात जैन समाज श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, वीर समाजाचे व्हा. चेअरमन सुभाष मगदूम, सेक्रेटरी अजित कुमार भंडे, जॉ. सेक्रेटरी अभय पाटील, सुनील पाटील यांच्यासह समडोळी येथील सकल जैन समाज आणि जैन मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.