yuva MAharashtra 10 सप्टेंबर पूर्वी रेल्वे उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू केली नाही तर रेल्वे प्रशासनाचे कामकाज बंद पाडणार आंदोलकांचा इशारा !

10 सप्टेंबर पूर्वी रेल्वे उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू केली नाही तर रेल्वे प्रशासनाचे कामकाज बंद पाडणार आंदोलकांचा इशारा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ ऑगस्ट २०२४
सांगली शहरातून उत्तरेकडील गावांना जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून सांगली माधवनगर रोड अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रेल्वेच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणानंतर या मार्गावरील चिंतामण नगर येथील रेल्वे उड्डाणपूल जवळ दीड वर्षांपूर्वी पाडण्यात आला. एक जानेवारी 2024 पासून या मार्गावरून वाहतूक सुरू करण्याची अट होती. परंतु 2024 साल संपत आले तरीही हा रेल्वे उड्डाणपूल सुरू झाला नाही. रेल्वे उड्डाणपूल तात्काळ स्वरूप करावा यासाठी नागरिक व सामाजिक संघटनांनी वारंवार आंदोलने करून रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे. मात्र तरीही ठेकेदार रेल्वे प्रशासनाकडून हा उड्डाणपूल सुरू होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाहीत.

हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार नितीन शिंदे व माधवनगरसह ग्रामीण भागातील व्यापारी नागरिकांच्या वतीने काल रेल्वे प्रशासना विरोधात चाबूक फोड आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी, 10 सप्टेंबर पर्यंत रेल्वे उड्डाण पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल व 30 सप्टेंबर पर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल असे लेखी आश्वासन आंदोलन करताना दिले. आंदोलनकर्त्यांच्या रुद्रावताराने प्रशासनाची तारांबळ उडाली. 


यावेळी माजी आमदार नितीन शिंदे रेल्वे अधिकाऱ्यांचे भंबेरी उडाली, पै. पृथ्वीराज पवार, प्रदीप बोथरा, समीर शहा, मनोहर सारडा, निलेश हिंगमिरे, राजू आवटी आदींनी रेल्वे आणिकरांना प्रश्न विचारून भंडावून सोडले. उत्तरे देताना रेल्वे अधिकारी यांची भंबेरी उडाली. यावेळी नितीन शिंदे म्हणाले की, चिंतामण नगर येथील रखडलेल्या रेल्वे उड्डाण पुलावरून 10 सप्टेंबर पर्यंत एकेरी वाहतूक सुरू केली नाही तर, रेल्वे प्रशासनाचे काम बंद पाडण्यांबरोबरच व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी रेल्वे प्रशासन व ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

पै. पृथ्वीराज पवार म्हणाले की रेल्वे अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे नाव जाहीर करावे, त्यांच्या मागणीनंतर रेल्वे अधिकाऱ्याने प्रताप पाटील असोसिएट हे नाव सांगितले. तेव्हा प्रताप पाटील यांच्या ऑफिसवर भव्य मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

प्रदीप बोथरा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला की, ठेकेदाराला पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी किती कालावधी दिला होता ? ठेकेदाराच्या कामाचे गती पाहता दिलेल्या मुदतीत तो पूर्ण होईल असे वाटत नाही. ठीक आहे त्याला शासनाने दिलेल्या रकमेनुसार काम झाले का ? फंड कमी पडत असेल तर आमदार खासदार पालकमंत्री यांच्या फंडातून रक्कम उपलब्ध करून देऊ पण लवकरात लवकर काम पूर्ण करा, असे आवाहन केले. समीर शहा म्हणाले की या रखडलेल्या रेल्वे पुलाच्या कामामुळे सांगली 25 वर्षे मागे गेली आहे.

यावेळी मनोहर सारडा, रामनिवास बजाज, दिलीप शहा, विनायक पाटील, मुरली मालानी, सुदर्शन माने, सोमेश बाफना, यांच्यासह व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.