| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २० जुलै २०२४
प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे समोर आल्याने, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि केंद्रशासन यांच्यावर विरोधकांनी शरसंधान केले. खेडकर यांच्याप्रमाणेच आणखी किती विद्यार्थ्यांना बोगस प्रमाणपत्रे दिली गेली ? असा सवाल करीत आयोगासह केंद्राला धारेवर धरले आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसभा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज सोनी यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. पूजा खेडकर यांच्या प्रकरणात नेमके दोषी कोण ? अद्याप याचा शोध लागला नाही. तरीही सोनी यांनी राजीनामा दिल्याने, आता त्यांच्या नावाभोवती वादाचे मोहोळ उठले आहे.
डॉक्टर सोनी हे 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य बनले त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी यूपीएससी बोर्डाचे अध्यक्ष पद स्वीकारले होते. अद्याप त्यांचा पाच वर्षाहून अधिक कार्यकाल शिल्लक असताना त्यांनी अचानक राजीनामा का दिला ? असे प्रश्न सर्वत्र विचारले जाऊ लागले आहेत. राजीनामा पत्रात त्यांनी 'वैयक्तिक कारणामुळे' हा मुद्दा लिहिला असला तरी, त्यातून निर्माण झालेले गूढ अधिक वाढले आहे.