| सांगली समाचार वृत्त |
दि. ६ जुलै २०२४
दोन वर्षांपुर्वी प्रियांका चोप्रा व फराहान अख्तर यांचा The sky is pink हा चित्रपट येऊन गेला. सर्वांग सुंदर सिनेमा होता. पण या सिनेमाला हे नाव का दिले असेल ?
तर या सिनेमातील एक दृष्य असे होते की प्रियांका आपल्या मुलीच्या आजारपणाच्या उपचारासाठी परदेशात गेली असता तिचा चार वर्षांचा मुलगा व नवरा भारतातच असतात. आई मुलाचे संभाषण रोज फोनवर होत असते. फोनवरच्या संभाषणाने आई व मुलामधले बेस्ट बाँडिंग तयार होत असते.
एके दिवशी मुलगा फोनवर आईला रडत रडत सांगत असतो की, माॅम मला आज आर्टस् टिचर खूप ओरडली. कारण मी आकाश गुलाबी रंगाने रंगवले होते. तर बाकीच्या मुलांनी ते निळ्या रंगाने रंगवले होते. टिचरचेही तेच म्हणणे होते आकाश कधी गुलाबी असते का ? पण माॅम सुर्य उगवताना तर आकाश गुलाबी असते ना? सांग ना माझ चूक आहे का ? माझे शाळेत कोणी ऐकूनच घेत नाही. पण मला आकाश गुलाबीच काढायचे आहे. भले मला कमी मार्क मिळू दे पण मला आकाश गुलाबीच काढावेसे वाटते. नाही काढायचे मला आकाश निळे. आणि चार वर्षाचा मुलगा हमसून हमसून रडायला लागतो.
लंडन मध्ये आई मुलीच्या आजारपणाने हळवी झालेली असते. मुलगी आजारपणातून बरी होणार नाही याची कल्पना आईला व मुलीलाही असते. आदल्याच रात्री ती आईला म्हणत असते, 'माॅम मला जगायचे आहे. मला नाही इतक्यात मरायचे.' आईचे ह्रदय पिळवटून निघते.
दुस-या दिवशी फोन वरून जेंव्हा मुलगा टिचर ओरडली म्हणून रडत असतो तेंव्हा तर भारतातल्या मुलासाठीही तिचा जीव तुटत असतो. तिला मुलाचे रडणे कुठेतरी आतपर्यंत जाऊन भिडते. ती विचार करते अरे खरंच किती छोट्या छोट्या गोष्टींमधलाही आनंद आपण घेऊ देत नाही मुलांना. जीवन किती क्षणभंगूर आहे. काय असे आभाळ कोसळणार आहे माझ्या मुलाने आकाश गुलाबी रंगाने रंगवले तर.
शेवटी ती फोनवर मुलाला ठामपणे सांगते,
"हे बघ बेटा, तुला आकाश गुलाबी रंगाने रंगवायाचे आहे ना ? मग तू गुलाबी रंगाने आकाश रंगव. तुझ्या आकाशाचा रंग कोणता असावा हे ठरवण्याचा हक्क फक्त तुलाच आहे. तू तुला जस वाटत तसच कर. तुझं म्हणणे बरोबर आहे. तू रंगव गुलाबी आकाश. मला आवडेल तुझे सुंदर गुलाबी आकाश. आईच्या या म्हणण्याने मुलगा आनंदतो व आईलाही समाधान मिळते की मी लांब असूनही माझ्या मुलाच्या पाठीशी ठाम उभी राहिले. त्याला त्याचा आनंद मिळवून दिला.
प्रसंग छोटा पण विचार करायला लावणारा. किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आग्रही असतो. किरकोळ गोष्टीतला आनंदही आपण उपभोगत नाही. सतत प्रत्येक गोष्टीत काहीतरी विसंवाद शोधत राहतो.
सिनेमाला हा प्रसंग मला थेट मी आठवीला असतानाच्या काळात घेऊन गेला. चला आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगते. गोष्ट छोटीशीच पण डोंगराएवढी मोठी.
तर आठवीत असताना माझी एक खूप जिवाभावाची मैत्रिण होती. सतत मी तरी तिच्या घरी असायची. नाहीतर ही तरी माझ्या घरी असायची. सतत आम्ही एकत्रच असायचो. तिच्या वडीलांची एक 3 मजली इमारत होती. त्यात 4 भाडेकरू रहात होते. या भाडेकरूंमधे देसाई नावाचे चौकोनी कुटुंब रहात होते. एक मुलगा, एक मुलगी आणि आई वडील.
मुलगी मोठी तर मुलगा लहान. मुलाचे नांव अमित. तर हा अमित एकदम लहान होता. म्हणजे 4 वर्षाचा. एकदम गोड. तर त्याच्या शाळेत चित्रं रंगवण्याची स्पर्धा होणार होती. शाळेतल्या शिक्षकांनी आधीच सांगितले होते स्पर्धेला हत्तीचे चित्रं आम्ही देणार आहोत. मुलांनी ते रंगवायचे आहे. सगळ्यांनी घरी मुलांकडून प्रॅक्टीस करून घ्या.
सगळ्या पालकांबरोबर अमितच्या घरीही प्रॅक्टीस करून घेतली जात होती. पण या पठ्ठ्याला हत्ती काळ्या पांढ-या रंगाच्या मिश्रणाच्या राखाडी रंगाने रंगवायचा नव्हता. आई मनापासून सांगत होती अरे हत्ती ग्रे कलरचा असतो. हत्तीची रंगवलेली चित्रं दाखवत होती. टि. व्ही. वर हत्ती दाखवत होती. हा तेवढ्या पुरता हा हो हो म्हणायचा. पण याला चित्रं दिले की हा कधी लाल, कधी हिरवा, तर कधी नीळा रंगवायचा. हे बघून आई चिडायची खूप ओरडायची. हा रडायचा. मग म्हणायचा लंगवतों काळ्या लंगाने हत्ती. पण परत तेच.
आता प्रकरण अमितच्या वडीलांपर्यंत गेले. वडीलांनीही त्याला सर्वोतोपरी समजावून सांगितले पण परिणाम शून्य. स्त्रियांपेक्षा पुरूषांची सहनशक्ति कमीच. त्यामुळे व्हायचे तेच झाले. बाबांनी अमितला मारले व रागाने कामाला निघून गेले.
अमितची आई दुःखी. मुलाला कसे समजवावे हे तिला कळत नव्हते. मनातून प्रत्येक आईप्रमाणे तिच्या त्या एवढ्याश्या बाल जीवाला बक्षिस मिळावे ही तीची इच्छा होती. अमितला वडिलांनी मारले. अमितने भोकाड पसरले. अमितचे बाबा दार आपटून निघून गेले. हे सगळ आम्हा दोघी मैत्रिणींना वर ऐकू आले. अमितचे बाबा गेल्याबरोबर धावलो आम्ही अमितच्या घरी. कारण इमारतीतला सगळ्यात गोंडस छोटूला मुलगा अमित. त्यामुळे त्याचे रडणे आम्हालाही कुठेतरी मनाला दुखवून जायचे.
आम्ही अमितकडे गेल्याबरोबर अमित 'दिदी' करत आमच्याकडे झेपावला. आता पर्यंत चापटही न खालेला अमित भोकाड पसरून रडत होता. मग आम्ही अमितच्या आईला विचारले 'काय झाले?' आईने सगळी परिस्थिती सांगतली.
आता आमचा मोर्चा अमितकडे. त्याला आम्ही दोघी गॅलरीत घेऊन गेलो. चिऊ दाखव. आगगाडी दाखव. काऊ दाखव अस करत आधी शांत केले. मग एक बडबड गीत म्हटले. त्याच्या बरोबर नाच केला. आता अमित रडणे विसरला. अमितला आई कडे सोपवून आम्ही परत मैत्रिणीच्या घरी गेलो. पण माझ्या डोक्यातून ते त्याचे हत्तीला कधी लाल, तर कधी हिरव्या रंगाने रंगवणे मनातून जाईना. काय केले म्हणजे अमितच्या मनासारखे होईल आणि त्याला बक्षिसही मिळेल. याचा विचार सतत माझ्या मनात घोळत होता. कारण मी हाडाची चित्रकार. सतत चित्रं काढणे हाच माझा उद्योग होता. आणि आणि.....
मला मार्ग सापडला मी मैत्रीणीला म्हणाले, 'चल चल अमितकडे. एकेका ढांगेत दोन दोन पाय-या उतरत आम्ही अमितकडे पोहोचलो. अमितच्या आईला 'अमित कुठे आहे ? मी सांगते अमितला कसे रंगावयचे हत्तीचे चित्रं.'
अमितला कागदावर हत्तीचे चित्रं काढून दिले. आता त्याच्याशी मी अत्यंत गोड शब्दात बोलू लागले. कुठेही तो नाराज होणार नाही याची काळजी घेत होते. मी-अमु बाळा हा बघ हा हत्ती. आता आपल्याला हा हत्ती रंगवायचा आहे. आता हत्ती बघितल्याबरोबर अमितने तोंड फिरवले.
"मी नाही लंगवणार हत्ती. मला नको बक्षिसं !"
पण मी आत्ता हट्टाला पेटले होते. हळूच म्हटले,
"हे बघ अमित ही आपली रंग पेटी. यातले कोणते रंग आवडत नाही ते मला दे. नकोच रंगवू त्या रंगाने तुझा हत्ती. पण तू दुस-या रंगानी चित्रं रंगव !"
माझे प्रयत्न बघायला अमितची आईही आली. नको असलेले रंग काढ म्हटल्यावर या पठ्ठ्याने बरोबर काळा व पांढरा रंग माझ्या कडे दिला. अमितची आई नाराज.
"बघ असे करतो हा. आता काय रंगवणार हा हत्ती. जाऊ दे चालू दे तुमचे !" असे म्हणून ती आत निघून गेली.
आता मी अमितला म्हटले,
"अरे वा अमितला काळा रंग नको वाटत. जाऊ दे मलाही नाहीच आवडत काळा रंग. दे टाळी !"
असे म्हणताच अमितची कळी खुलली. हा चित्रं रंगवायला तयार झाला. मग मी हळूच अमित पुढे प्रस्ताव ठेवला.
"हे बघ अमित, आता तुला हवे तेवढे छान छान आवडणारे रंग वापर. पण रंग रेघेच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही. कळलं?"
अमित खूष झाला. त्याने होते नव्हते ते सगळे रंग वापरले. झाला एकदाचा त्याचा हत्ती रंगवून लाल, हिरवा, पिवळा, निळा सगळ्या रंगांनी सजला. अमित एकदम खूश. मीही...
"अरे वा एकदम भारी. पण बेटा आता तुला बाई विचारतील की हत्ती असा असतो का? मग तू काय उत्तरं देशील?"
आता अमित हिरमुसला. गप्प बसला. त्यावर त्याला 'टाळी दे टाळी दे' असे म्हणत त्याला सांगितले
"तू बाईंना सांगायचे, नाही हत्ती काळा असतो. पण माझा हत्ती रंगपंचमी खेळला आहे. म्हणून तो असा दिसतो आहे !" अमित खूश.
"दिदी, अजून दे अजून दे हत्ती काढून. अजून लंगवतो मी !"
मग त्याने मनापासून अगदी आवडीने चार पाच हत्तीची चित्रे रंगवली. मी म्हटले,
"अमित हे बघ मी सांगितलेले तू बाईंना सांगितले नाहीतर तुला बक्षिसं मिळणार नाही. बाईंनी जरी तुला विचारले नाही तरी तिथे असणा-या सगळ्यांना जाऊन तू तुझे चित्रं दाखव आणि सांग तुझा हत्ती कसा रंग खेळला ते. मग बघ तुला मोठे बक्षिसं मिळेल !"
अमितच्या आईलाही सांगितले
"काकू रंगवू दे त्याला हव्या त्या रंगाने हत्ती. सगळ्या वर्गात याचाच हत्ती वेगळा असेल. एखादे वेळेला बक्षिसं मिळून ही जाईल !"
दुस-या दिवशी अमित बरोबर आम्हीही दोघी मैत्रिणी गेलो शाळेत. याने याला हवे ते रंग मनसोक्त वापरून हत्ती रंगवला होता. बाईंनी चित्रं घेताना विचारलेच 'हत्ती या रंगाचा असतो अमित?' आता आमचे याच्या उत्तराकडे लक्ष. याचे बोबड्या शब्दात उत्तरं.
"नाही हत्ती काला असतो. पन माझा हत्ती लंगपंचमी खेलला आहे म्हणून अशा दिशतो !"
खेळ खल्लास. बाईही मनापासून खूश.
पुढे हे काय सांगायला हवे का? अमितला त्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे बक्षिसं मिळाले. आई खूश. बाबा खूश. अमितही खूश. मी तर सगळ्यात खूश. पुढे हाच अमित प्रत्येक स्पर्धेला मी सांगेन ते मनापासून ऐकायचा. आणि त्याची आई हसून म्हणायची तुला ना वशीकरण येत बाई. तुझेच ऐकतो हा निमुटपणे.
आता या गोष्टीतून आपण नेमके काय शिकायचे. तर आपल्याकडेही देवाने एक वेगवेगळ्या भावभावनांची व इतिहास जमा गोष्टींची छान रंगपेटी दिलेली आहे. त्यातूनच मग आपल्याला एक आपल्या आयुष्याचे चित्र बनवायचे आहे. तर मग आपल्या रोजच्या जीवनात आपण आपल्या चित्रात कोणते रंग भरायचे ते आपण ठरवायचे आहे. जुनेच उगाळत आपल्याच चित्राला सतत काळा रंग द्यायचा आहे का ? का रोज प्रसन्न असे सप्त रंग भरायचे आहेत ?
आपण तर अभियंते आहोत. आपण समाजातील 'सो काॅल्ड' उच्च वर्गात समाविष्ट होणारे घटक आहोत. आपला आदर्श इतरांसमोर ठेवत आपण मोठे झाले पाहिजे. आपले चित्र सुंदर असले पाहिजे. कारण हेच चित्र पहात आपली भावी पिढी चित्र रंगवणार आहे. त्यामुळे भावी पिढीला पैसे शिक्षण व नोकरी याबरोबरच एक अल्हाददायक प्रसन्न आयुष्य देणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आजपासून आपल्या रंगपेटीतला काळा रंग थोडा बाजूला ठेऊन सुंदर असे सप्तरंग वापरत आपण एक चित्र काढू या. म्हणजे हेच चित्र आपल्या मुलांच्या, नातवांच्या मनात घर करून राहिल आणि हेच चित्र आपला पारंपारिक वारसा बनेल.
मग काय sky is pink नाहीतर लंगपंचमी खेळलेला हत्ती असू दे. आपण मात्र आपले चित्र सुंदर रंगाने सजवत राहू. यातूनच समाजात निरागस मनाचे व जीवनाचा खरा अर्थ केलेले सुखी माॅडर्न आर्टिस्ट तयार होतील. जे स्वतः मानसिक दृष्ट्या सुखी असतील व इतरांनाही सुखी करतील. कारण दुस-याला आनंदी करणे यापेक्षा मोठा आनंद नाही.
त्याचबरोबर आपल्याला आपल्याला "भावी पिढीला बक्षिस कसे मिळवता येईल", हे शिकवायचे आहे. त्यांना विनाकारण अनावश्यक गोष्टींमध्ये अडकवत त्यांचे आयुष्य भरकटत न्यायचे नाही. बरोबर ना? चला तर मग, आजपासून आपण आपले चित्र सुंदर आठवणींच्या रंगातच पूर्ण करू.
लेखिका - अज्ञात...
(वॉटस् ॲपवरून साभार)