yuva MAharashtra पूजा खेडकर प्रमाणे राज्यातील इतर दोन उपजिल्हाधिकाऱ्यांनी MPSC ला गंडवले ?

पूजा खेडकर प्रमाणे राज्यातील इतर दोन उपजिल्हाधिकाऱ्यांनी MPSC ला गंडवले ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० जुलै २०२४
खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर आयएएस पूजा खेडकर यांनी ज्याप्रमाणे UPSC ला गंडवलं त्याच धर्तीवर राज्यात MPSC ची फसवणूक करीत शासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या अधिकाऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाल्या नसल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

विजय वडेट्टीवार यांनी माधुरी कल्याण नष्टे व अजय कल्याण नष्टे या दोघांनीही दिव्यांग असल्याचं सांगत, एमपीएससीला फसवल्याचा आरोप केला आहे. हे दोघेही उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. पैकी माधुरी नष्टे या सातारा येथे तर अजय नष्टे हे सांगली येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.


याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, माधुरी व अजय नष्टे या दोघांनी 80 टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवले आहे. त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असून, या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी शासकीय नोकरीचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोघांवरही फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यांच्या आरोपामुळे सातारा व सांगली जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. याबाबत आता शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.