| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. १४ जुलै २०२४
महाराष्ट्र शासनातर्फे विद्यार्थ्याना देण्यात येणारा शालेय पोषण आहार सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकतो आहे. यातील ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे लहानग्या मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. परंतु प्रशासन याकडे गांभीर्याने पहात नसल्याने पालकातून संताप व्यक्त होत आहे.
सांगली जिल्ह्यातील अनेक गावात मृत प्राण्यांचे अवशेष सापडले होते. आता पंढरपूरच्या कासेगाव येथील भुसेनगर परिसरातील अंगणवाडीमध्ये पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात मृत बेडूक आढळण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
मुलांना शाळेची गोडी लागावी, पटसंख्या वाढावी यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये फी सवलतीसह, शालेय साहित्य आणि पोषण आहाराचा समावेश आहे. शालेय साहित्याच्या गुणवत्तेबरोबरच आता शालेय पोषण आहाराची गुणवत्ता ही सुद्धा चिंतेचा विषय बनली आहे. विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारामध्ये मृत प्राणी सापडण्याची मालिका सुरूच आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे की काय अशी शंका या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे.
त्यामुळे लहानग्यांच्या जीवावर उठलेल्या संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची गरज व्यक्त करीत शासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याचे आवश्यकता आहे. यासाठी आता आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्याप्रमाणेच सर्वच आमदारांचा महाराष्ट्र विधानसभेत पुन्हा एकदा आवाज घुमला पाहिजे, अशी अपेक्षा पालकातून व्यक्त होत आहे.