yuva MAharashtra अर्थसंकल्प - मान्यवरांच्या प्रतिक्रिया !

अर्थसंकल्प - मान्यवरांच्या प्रतिक्रिया !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जुलै २०२४
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्प सादर केला आणि यावर अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यातील काही गुणगौरवाच्या तर काही टीकात्मक. पण सर्वाधिक चर्चेचा विषय बनली ती खासदार अमोल कोल्हे यांचे प्रतिक्रिया...

बिहारचे मुख्यमंत्री व जेडीयुचे प्रमुख नितेश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूवर मोदी सरकार टिकून आहे. या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशला जाहीर झालेल्या पॅकेजबाबत भाष्य केले आहे. म्हणजेच बिहार आणि आंध्र प्रदेशला जाहीर झालेले पॅकेज आणि महाराष्ट्राकडे केलेलं दुर्लक्ष यामध्ये राजकारण होत असल्याचे त्यांनी म्हटल आहे.

ट्विटरवर आपली प्रतिक्रिया एका अनोख्या अंदाजात व्यक्त केली आहे. 'घालीन लोटांगण वंदीन चरण !' या गणेश स्तुतीचे विडंबनात्मक काव्य अमोल कोल्हे यांनी सादर केले. खोचक शब्दात प्रतिक्रिया देताना खा. कोल्हे यांनी म्हटल आहे की, 

आजच्या अर्थसंकल्पाचा सारांश :
घालीन लोटांगण वंदीन बिहार,
डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे,
दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र,
सरकार वाचवेन म्हणे नमो !!

खा. विशाल पाटील


काँग्रेस पक्षाचे सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून देशात सर्वात जास्त जीएसटी संकलन देणारे हे राज्य आहे तरीही अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी कोणतेही ठोस योजना नाही. यातूनच भाजपा सरकारचा महाराष्ट्र बाबतचा आकस दिसून येतो. हा महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय करत असून जनतेची घोर निराशा करणारा आहे. सर्वसामान्य माणूस व शेतकरी वर्गासाठी हा अर्थसंकल्प निराशा जनकच आहे आजचा अर्थसंकल्प केवळ आंध्र प्रदेश आणि बिहारचाच दिसत असल्याचा टोल आहे का पाटील यांनी दिला आहे.

आ. सुधीर दादा गाडगीळ यांची प्रतिक्रिया


केंद्रीय अर्थसंकल्पात गरीब वर्ग, महिला, युवक आणि शेतकरी यांच्या विकासाचा तसेच प्रगतीला पूर्ण प्राधान्य दिलेले आहे. त्यादृष्टीने अनेक योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्या आहेत. सहकार क्षेत्रासाठी देशव्यापी व्यापक धोरणही प्रथमच जाहीर झाले आहे. त्याचबरोबर कर सवलतींचा निर्णय मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे, असे मनोगत आ. सुधीर दादा गाडगीळ यांनी व्यक्त केले आहे.

आ. गाडगीळ यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या भूमिकेनुसारच देशातील गरीब वर्ग, महिला, युवक आणि अन्नदाता शेतकरी यांना समोर ठेवूनच यंदाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. यामध्ये महिलांना विकासाच्या अनेक संधी देणाऱ्या योजना जाहीर करण्यात आल्या असून युवकांना रोजगार आणि कार्य कौशल्य विकास यांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी उत्पादकता वाढीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतीमालाच्या किमती बाबतही शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. सोयाबीन आणि सूर्यफूल यासारख्या स्टील बियांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे नैसर्गिक शेतीला सरकार यापुढे प्राधान्य देणार असल्याचेही अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले आहे. ऊर्जा क्षेत्राचा विकासासाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्ये सौरऊर्जेला सहाजिकच अधिक प्राधान्य दिसून येते.

शहर विकासासाठी ही वेगवेगळ्या योजना जाहीर काय असून देशातील शंभर शहरे निवडण्यात येणार असून, तेथील नागरी सुविधांसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. रोजगार निर्मितीवर या अर्थसंकल्पात मोठा भर देण्यात आला आहे. तरुणांच्या हाताला काम हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर 80 कोटी गरिबांसाठीचे असलेली मोफत धान्य योजना यापुढेही पाच वर्षे सुरू राहणार असल्याचे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्ष प्रणित 'एनडीए'ने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचे पाऊल या अर्थसंकल्पात टाकण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महागाईला आळा, विकासदरात आघाडी, परकीय गुंतवणुकीला प्राधान्य, बँकिंग व उद्योग क्षेत्र मजबूत करणे, सहकार क्षेत्राला ताकद देणे, अशा सर्व आघाडीवर काम करीत असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. असेही आ. गाडगीळ यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

माजी खासदार संजय काका पाटील


यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक, सामान्य जनतेला दिलासा देणारा असा आहे भाजप सरकारच्या तिसऱ्या पर्वातील हा पहिला अर्थसंकल्प असून यामध्ये शेतकरी युवक नोकरदार याचबरोबर नवोद्योजकांना सूक्ष्म व लघुउद्योगाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीस चांगला देणारा आणि भविष्यातील पायाभूत सुविधा मजबूत करणारा हा अर्थसंकल्प देशाला नक्कीच प्रगती पथावर नेहील असा विश्वास संजय काका पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पृथ्वीराज गुलाबराव पाटील


लोकसभा निवडणुकीत भारतीय जनतेने ‘तारे जमीं पर’ आणल्यानंतरचा आजचा पहिला अर्थसंकल्प म्हणजे आत्मविश्‍वास गमावलेल्या सरकारची अवसान एकवटण्याची धडपड आहे. सगळ्या घटकांचा ओढून-ताणून उल्लेख केला गेला, मात्र कुणाचेही पूर्ण समाधान होईल, असे काही हाती लागताना दिसत नाही. शाब्दिक बुडबुडे हे या सरकारचे नेहमीच वैशिष्ट्य राहिले आहे. आजही असे अनेक बुडबुडे हवेत उडाले आहेत. यथावकाश ते फुटलेले दिसतील. सरकारने आपल्या कुबड्या म्हणजे बिहार आणि आंध्रप्रदेश मजबूत करण्याचा कसोसीने प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले गेले. महाराष्ट्राने भाजपला नाकारल्याचा राग त्यातून दिसत आहे. घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्याने पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षिन राष्ट्र, उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन नमो, नमो, अशीच अवस्था आहे.

पै. पृथ्वीराज संभाजीराव पवार

कृषी क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प असून एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प असून एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणे, तसेच शेती आणि मानवी आरोग्य यांचे सांगड घालणारा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याचा नक्कीच लाभ होईल. भाजीपाला क्लस्टरचा उपयोग, सांगली जिल्ह्याला देखील होऊ शकतो असा विश्वास पै. पृथ्वीराज पवार यांनी व्यक्त केला आहे. तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी विशेष प्राधान्य या अर्थसंकल्पात देण्यात आलेले आहे स्ट्रीट फूड क्लस्टर हा विषय फेरीवाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यातून त्यांच्या व्यवसायाला स्थैर्य मिळू शकते. कौशल्य विकास साठी निधीची तरतूद ही अत्यंत स्वागतार्य बाब आहे. कुशल कामगार हा या देशाचे बलस्थाने बनेल, असा विश्वास या अर्थसंकल्पातून मिळालेला आहे. महिलांच्या विकासासाठीही भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. एकूणच देशातील सर्व घटकांना मजबुती देण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो, असे पै. पवार यांनी म्हटले आहे.