yuva MAharashtra राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन उत्सव उपक्रमाचे आयोजन !

राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन उत्सव उपक्रमाचे आयोजन !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ जुलै २०२४
विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, नवीन पिढीची मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीशी नाळ जोडली जावी, या उद्देशाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात २२ जुलै ते ३० ऑगस्ट दरम्यान 'महावाचन उत्सव २०२४' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आंबेसेटर म्हणून काम करण्याचे मान्य केले आहे.

याबाबतचा निर्णय राज्य सरकारने २२ नोव्हेंबर २०२३ रोजी घेतला होता, गेल्या वर्षी ५ डिसेंबर रोजी उपक्रमाचा शुभारंभ झाला. यामध्ये ६६ हजार शाळा आणि ५२ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यंदा त्याच धर्तीवर 'महावाचन उत्सव २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे.


उपक्रमाची वैशिष्ट्ये
  • वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे

  • विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे

  • मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी नाळ जोडणे

  • विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देणे

  • विद्यार्थ्यांमध्ये भाषा संवाद कौशल्य विकसित करणे

असे असेल स्वरूप

  • महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत उपक्रमासाठी स्वतंत्र वेब पोर्टल विकसित करण्यात येईल.

  • उपक्रमात सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील आणि तो विचार लिखित स्वरूपात संबंधित पोर्टलवर अपलोड करतील.

  • विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाची सारांश देणारी एका मिनिटाची ध्वनिचित्रफित, ध्वनिफित पोर्टलवर अपलोड करतील.

  • ग्रंथालय प्रदर्शन, पुस्तक मेळावे आयोजित करण्यात येतील.

  • तालुका, जिल्हा, शैक्षणिक विभाग, राज्य स्तरावर विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिके दिली जातील.