| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० जुलै २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीस अद्याप दोन महिने बाकी आहेत. परंतु महायुती असो वा महाआघाडी यांचे 'आपआपसातील नाते' या ना त्या कारणाने जनतेसमोर येत असल्याने, यांचा खरा चेहरा कोणता असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील प्रमुख असलेल्या काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर नकाराची मोहोर उमटवली आहे.
गेले काही दिवस, विशेषतः लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळवल्यानंतर महाआघाडीतील तीनही पक्षांना 'मोहोर' फुटला आहे. प्रत्येकाला आपणच शिरजोर असल्याचा साक्षात्कार होतो आहे. अशातच शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत हे आपली स्वामी भक्ती दाखवित, 'उद्धव ठाकरे हेच आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा चेहरा असतील' असे वारंवार सांगत आहेत. परंतु त्यांच्या या फुग्याला टाचणी लावीत त्यातील हवा काँग्रेसने काढून घेतली आहे.
काल मुंबई येथे झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारणी बैठकीत काँग्रेसचे संघटन सरचिटणीसखा. के. सी. वेणूगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या प्रमुख उपस्थितीत ' महाआघाडी हाच आगामी विधानसभेचा चेहरा असेल' असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या चेहऱ्यावरून महाआघाडीत धुसफूस सुरू होते की काय अशी शंका व्यक्त होत आहे.
खरे तर महाआघाडी एकसंघपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असे सांगितले असतानाच, दोन घटना या 'एकसंघतेवरील' निर्णयावर घाव घालताना दिसून आल्या. पैकी एक म्हणजे ' विधानसभेत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा' आणि दुसरी घटना म्हणजे महाराष्ट्रातील समाजवादी पार्टीचा चेहरा अबु आझमी यांनी काँग्रेस पाठोपाठ दिलेला 'एकला चलो रे' चा नारा...
त्यामुळे आता कात टाकून उभे ठाकलेल्या महायुतीसमोर महाआघाडी एक संघपणे सामोरे जाणार की त्याची शकले उडणार हे येणाऱ्या काळात सर्वांसमोर येईल. तोपर्यंत विधानसभा निवडणुकीतील चेहऱ्यावरून आरोपांची धुळवड रंगणार आहे हे नक्की.