Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीवाडी स्मशानभूमीत तातडीने सुविधा देण्याची पृथ्वीराज पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ जुलै २०२४
सांगलीवाडीच्या कृष्णा काठावरील स्मशानभूमीत आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने अंत्यसंस्कार व रक्षाविसर्जन प्रसंगी मयतांचे नातेवाईक व उपस्थित नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. गावातील समाजसेवी संस्थांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे यापूर्वी मागणी करुन सुविधा अद्याप उपलब्ध केल्या नाहीत. सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांनी महापालिका प्रशासनास मागण्यांचे पत्र देऊन स्माशनभूमीतील गैरसोयी काय आहेत याची आयुक्तांनी समक्ष भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी केली आहे.


समस्या निराकरण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी 'नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी स्मशानभूमीत रक्षाविसर्जन कुंड ठेवावे व दर आठवड्याला ती गरजेनुसार महापालिकेने रिकामी करावे. लोखंडी रुग्ण शिबिका (स्ट्रेचर) ऐवजी हलक्या स्टीलचे स्ट्रेचर, नागरिकांना बसण्यासाठी बाकडी व स्वच्छतागृहे इ. सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची आग्रही मागणी महापालिका प्रशासनाकडे केली. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी सांगलीवाडीच्या या संवेदनशील विषयात लक्ष घालून प्रशासनाकडे सांगलीवाडीची कैफियत मांडली त्याबद्दल त्यांना सांगलीवाडीकर धन्यवाद देऊन समाधान व्यक्त करीत आहेत.