yuva MAharashtra टेलर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे टेलर्स एक्सपोचे आयोजन - बसवराज पाटील

टेलर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे टेलर्स एक्सपोचे आयोजन - बसवराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ जुलै २०२४
सांगली येथील नेमिनाथ नगरच्या भव्य ग्राउंडवर 21, 22, 23 सप्टेंबर 2024 दरम्यान भव्य टेलर्स एक्सपोचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, टेलर्स वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिली. येथील गणेश मंगल कार्यालयात टेलर्स वेल्फेअर असोसिएशनच्या पाचव्या वार्षिक सभेत ते बोलत होते.

सभेची सुरुवात शिंपी समाजाचे आराध्य दैवत शिलाई मशीनची पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक व स्वागत दादा टिकारे यांनी केले. तर वार्षिक सभेचे विश्लेषण करून असोसिएशनची पूर्ण माहिती राज्याचे सचिव शशिकांत कोपर्डे यांनी दिली.


यावेळी वेल्फेअर असोसिएशनच्या विविध वक्त्यांनी टेलरिंग व्यवसायामधील 'आव्हाने आणि संधी' याबाबत माहिती दिली. तर या 'टेलर्स एक्सपो'मध्ये होणाऱ्या 'फॅशन शो' सोहळ्याबद्दलची माहिती व आढावा, ज्येष्ठ टेलर्स व पुणे असोसिएशनचे अध्यक्ष गोंदकर यांनी मनोगत व्यक्त करताना दिली.

टेलर्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या संचालिका वैशालीताई खटके यांनी महिलांसाठी 'टेलर्स एक्स्पो'मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या सेमिनार व वर्कशॉपचे बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी सांगली शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना, संघटनेच्या कार्यात आपले संपूर्ण सहकार्य राहील आणि टेलर्स व्यवसायिकांच्या अडचणी सोडवण्याबाबत आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक रोहिणी पाटील, सोनिया पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून संघटनेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. वरील सर्व मान्यवरांचे टेलर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे सर्वांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी सांगलीसह पुणे, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागातून 300 हून अधिक सभासद बंधू-भगिनी खास करून उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भुदरगड तालुका अध्यक्ष सुनील कापसे, पुणे येथील रवींद्र गोंदकर, सांगोल्याचे दत्ताभाऊ शेटे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष युनुसभाई नायकवडी, राधानगरी तालुका अध्यक्ष राजाराम कांबळे, मिरज तालुका माजी अध्यक्ष जयप्रकाश होनमोरे, कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे, राज्य महिला संचालिका सौ. वैशाली खटके, गारगोटीचे शिवाजी साबळे, सांगलीचे अध्यक्ष शहाबाजभाई झारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मिरज तालुका टेलर्स वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नरेंद्र रामचंद्र रामभरे यांचा गुलाबी पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी मिरज तालुका टेलर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव प्रताप होनमोरे यांनी आभार प्रदर्शन करून, उपस्थितीबाबत कृतज्ञता व्यक्त केली.