| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ३१ जुलै २०२४
महाराष्ट्र सरकारने गाजत वाजत सुरू केलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' पहिल्या दिवसापासून संकटाच्या फेऱ्यात सापडली आहे. दररोज एका नवीन नियमामुळे महिलांवर अर्ज दाखल करण्यास विलंब होत असल्याने शासनावर टीका आहे. आता ही योजना एका लाडक्या बहिणीवर घटस्फोटाची वेळ आल्यामुळे चर्चेचा व टीकेचा विषय बनली आहे.
मागील पंधरा दिवसांपूर्वी गायब झालेल्या वृद्धाचा फोटो वयोश्री योजनेतील जाहिरातीत वापरला गेल्यामुळे, पुणे जिल्ह्यातील त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. आता याच पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर मध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. त्यामुळे 'वयोश्री योजने'प्रमाणेच 'मुख्यमंत्री बहिणी योजना' ही टीकेच्या केंद्रस्थानी आली आहे.
पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी लाडकी बहीण योजनेसाठीच्या बॅनरवर कोणतीही पूर्व परवानगी न घेता दोन महिलांचे फोटो वापरले. यावरून यातील एका महिलेच्या पतीला नातेवाईक ं व मित्रांकडून वारंवार विचारणा होत असून, होय या महिलेचा पती संतापला असून त्याने तिला घटस्फोटाची धमकी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या होर्डिंगवर ज्या दोन महिन्यांचे फोटो आहेत, त्यामध्ये नम्रता कावळे आणि भागीरथीबाई कुरणे यांचे फोटो कोणतीही पूर्व परवानगी न घेता छापण्यात आले आहेत. यामुळे या जाहिरातीतील फोटो वापरलेल्या एका महिलेने थेट पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. भीम आर्मीचे पदाधिकारी सिताराम गंगावणे यांनी आमदार शिरोळे यांनी घातलेला हा गोंधळ उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे या दोन्हीही महिलांनी 'मुख्यमंत्री लाडके बहीण' यासाठी अर्ज केलेले नाहीत.
आमदार शिरोळे यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता पुण्यातील नाक्या नाक्यावर या महिलांचा समावेश असलेले होर्डिंग लावल्यामुळे, त्यांची बदनामी होत असल्याचे सिताराम गंगावणे यांनी म्हटले आहे. भीम आर्मीच्या गंगावणे यांनी या दोन्ही महिलांच्या समवेत हे पोस्टर फेसबुक वर लाईव्ह केले आहे. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शिडी लावून या होर्डिंग वरील संबंधित महिलांचे फोटो कट करून आ. शिरोळे व शिंदे सरकारचा निषेध नोंदवला आहे. शिंदे सरकारची लाडकी बहीण योजना गोरगरीब महिलांचे संसार उध्वस्त करायला उठली आहे का असा सवाल ही या निमित्ताने संतप्त महिलांकडून उपस्थित होत आहे.
दरम्यान शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आ. सिद्धार्थ शिरोळे यांनी याबाबत म्हटले आहे की, या बॅनर्सवर फोटो लावण्यासाठी सदर महिलांची परवानगी घेतली आहे. हा फोटो आत्ताचा नसून, ज्या फोटोग्राफर्स कडून घेण्यात आला आहे, त्याने तो 2016 साली काढलेला आहे. तरीही बॅनर्सवर हे फोटो समाविष्ट करण्यापूर्वी सदर महिलांची परवानगी घेण्यात आल्याचा दावा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केला आहे. या प्रकारामुळे जर त्या महिलांना वेदना झाल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असेही शिरोळे यांनी म्हटले आहे.
पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र तोपर्यंत ही जाहिरात आणि संबंधित प्रकार संपूर्ण राज्यात वायरल झाला असून, सरकारी योजनेची जाहिरात करीत असताना अशा प्रकारच्या चुका होणे गंभीर बाब असल्याची टीका होत आहे.