Sangli Samachar

The Janshakti News

...तर माझ्या विरोधात हक्कभंग आणा, देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आव्हान !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ जुलै २०२४
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सध्या राज्यपालांच्या अभिभाषनावरील चर्चेच्यनिमित्ताने आरोप प्रत्यारोपांच राजकारण चालू आहे. सत्ताधारी व विरोधक या दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप केले जात आहेत. विधान परिषदेत या संदर्भात चालू असलेल्या चर्चेमध्ये विरोधी पक्षांकडून राज्यातील नोकर भरतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सरकारी नोकर भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये पेपर फुटीचे अनेक प्रकरणे समोर येत असल्याचा दावा विरोधकांनी केला असता, सत्ताधारी पक्षाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिले. आपण चुकीचे असलो तर माझ्या विरोधात हक्कभंग आणा असं थेट आव्हानच फडणवीस यांनी विरोधकांना दिले.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात विरोधकांकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, "नोकर भरतीचा विषय येथे मांडला गेला. या नोकर भरती सरकारने पारदर्शकपणे केलेल्या आहेत. नोकर भरतीचा विक्रम केला असल्याने विरोधकांचा पोटशुळ उठला असल्याचा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. आपण 75 हजार पद भरण्याची घोषणा केली होती. त्यातल्या 57 हजार 452 लोकांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत. यासाठी 19,853 लोकांची परीक्षा घेतली आहे. पुढच्या महिन्याभरात त्यांनाही नियुक्ती आदेश दिले जातील. म्हणजेच एकूण 77 हजार 305 लोकांना नोकर भरती देण्यात आली आहे. हा कोणत्याही सरकारच्या काळापेक्षा अधिक विक्रम आहे, असे फडणवीस म्हणाले. पुढील तीन महिन्यात 31 हजार एक पदांच्या नियुक्ती आदेशाचा काम पूर्ण होईल. तीन महिन्याच्या काळात एक लाख सरकारी नोकऱ्या देण्याचा विक्रम आमच्या सरकारने केला आहे एकूण 69 लाख 15 हजार 471 विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या असून, त्यातून ही पदे भरली गेली आहेत. हे सगळं होत असताना त्यात पेपर फुटीचे एकही घटना घडलेली नाही असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.


देवेंद्र फडणवीस यांच्या या माहितीवर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी आपली माहिती खरी असल्याचे ठामपणे सांगितले. ते म्हणाले की पेपरच्या बातम्यावर विसंबून राहून आरोप करू नका, मी उपमुख्यमंत्री म्हणून अधिकृतरित्या सांगतोय. हे खरं नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा, असे थेट आव्हानच फडणवीस यांनी यावेळी दिले.