| सांगली समाचार वृत्त |
विशाळगड - दि. १५ जुलै २०२४
विशाळगडावरील बेकायदेशीर 'अतिक्रमणे हटवा' या मागणीसाठी आज माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडावर आपल्या समर्थकांसह धडक मारली प्रशासनाने अतिक्रमण दूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान सकाळी छत्रपती संभाजीराजे विशाळगडावर पोहोचण्यापूर्वीच काही अज्ञातांनी दगडफेक केल्याचा दावा विशाळगडावरील रहिवाशांनी केला आहे. तसेच पोलिसांच्यावरही दगडफेक करण्यात आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु दगडफेक कोण केले हे मात्र समजू शकले नाही.
पोलिसांनी छत्रपती संभाजी राजे यांना 'गडाकडे जाऊ नका', असे आवाहन केले होते. परंतु संभाजी राजे यांनी विशाळगडाकडे कोणत्याही परिस्थितीत जाणारच असा निर्णय घेतला. त्यानुसार काल सकाळी तुळजाभवानीचे दर्शन घेत ते विशाळगडाकडे रवाना झाले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजीही झाली.
यावेळी बोलताना छत्रपती संभाजी राजे म्हणाले की आयुष्यातील पहिला गुन्हा विशाळगडावर जात आहे, म्हणून दाखल झाल्यास मला अभिमानच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही विशाळगडावर पोहोचत आहोत. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असला तरी आम्ही विशाळगडावर जाणारच असे राजे यांनी म्हटले आहे.
यावेळी स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्याने संकटात मदत केली तोच विशाळगड किल्ला सध्या संकटात आहे आज विशाळगडाचे अतिक्रमण मुक्त करणारच असे म्हटले आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर काही हिंदुत्ववादी संघटनाने आक्षेप घेतला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना छत्रपती संभाजी राजे ही आंदोलन का करीत आहेत, हे अनाकलनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीराजांनी याबाबत राजकारण न करता राज्यातील सर्व गडावरील अतिक्रमणे मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे काढावीत अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवरच हिंदुत्ववादी संघटना मंदिर बांधतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिला आहे. किल्ले विशाळगडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे पर्यटकांना आणि भाविकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली होती.
प्रत्यक्ष गडावर पोलिसांनी कोणालाही सोडले नाही पण त्याच वेळी संतप्त जमावाने गडाला लागून असलेल्या गजापुरात काही घरे पेटवून दिले दारात लावलेल्या गाड्यांवर तुफान दगडफेक करून काही चार चाक्या गाड्या उलटवून टाकल्या एका घराला लागलेल्या आहेत सिलेंडरचा स्फोट झाला त्याच घरात आणि चार भरलेले सिलेंडर ही होती पण वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
विशाळगडावर सुमारे 158 अतिक्रमणे आहेत यापैकी सहा अतिक्रमणाबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. ही अतिक्रमणे वगळून अन्य अतिक्रमणे काढावेत यासाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून कोल्हापुरात मोर्चे बांधणे सुरू आहे गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीराजे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी आज विशाळगडावर जाऊन ही अतिक्रमेने हटवण्याचा इशारा दिला होता, त्यानुसार त्यांनी आज विशाळगडाला भेट देऊन अतिक्रमणे हटवण्याबाबत शासनास सूचना केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.