yuva MAharashtra इंद्रायणी नदीत कोसळणाऱ्या बसमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूआड ज्ञानोबा माऊलीच धावली !

इंद्रायणी नदीत कोसळणाऱ्या बसमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूआड ज्ञानोबा माऊलीच धावली !


| सांगली समाचार वृत्त |
फुलगाव - दि. ५ जुलै २०२४
'देव तारी त्याला कोण मारी ?'अशी एक आपल्याकडे म्हण आहे. ज्याच्या आयुष्याची दोरी बळकट आहे, त्याच्या मृत्यूआड प्रत्यक्ष परमेश्वर उभा असतो असेही म्हटले जाते. याचेच प्रत्यंतर च-होलीतील इंद्रायणी नदीकाठावरील नागरिकांना आला.

आळंदी येथील लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलची एक बस च-होली, वडमुखवाडी, परिसरातील अनेक विद्यार्थ्यांची ने-आण करीत असते. गुरुवारी नेहमीप्रमाणेच या शाळेतील काही विद्यार्थी बसने शाळा सुटल्यानंतर घरी परतत होते. आळंदी-मरगळ रोडने विद्यार्थी घेऊन जात असताना च-होळी येथील दाभाडे सरकार चौकाजवळील इंद्रायणी नदीच्या पुलावर बस आली आणि बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले. बस थेट कठडा तोडून नदीत कोसळणार की काय ? असा प्रसंग उभा राहिला. परंतु जणू ज्ञानेश्वर माऊलीच या बसमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यू समोर उभी राहिली आणि बस पुलाच्या अर्ध्यावर जाऊन थांबली.

हा प्रकार घडताना बसमधील मुलांचा आणि तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या जीवाचे पाणी पाणी झाले. नागरिकांनी तात्काळ बसकडे धाव घेतली. च-होलीतील तुषार दाभाडे, सुशील निगडे, विष्णू तापकीर, संकेत तापकीर, सागर दाभाडे ओंकार भुजबळ, सुनील गावडे यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडून, विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले आणि नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सध्या जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. काळ काळ आला होता पण वेळ आली नव्हती, वरील तरुणांच्या रूपाने ज्ञानेश्वर माऊलींनीच धाव घेत या विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. परंतु या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस चालकांना शिस्तीचे धडे देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे पालकातून बोलले जात आहे.