| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ जुलै २०२४
गेल्या काही महिन्यांमध्ये सांगली जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे हे ॲक्शन मोडवर आले असून, त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्रीनंतर अचानक राबवलेल्या -ऑल आउट ऑपरेशन'मध्ये वांटेड असलेल्या आठ तर फरारी आठ अशा सोळा आरोपींच्या मुस्क्या आवडल्या. त्याचबरोबर दोन हद्दपार केलेले आरोपी यादरम्यान पोलिसांच्या रडारवर आले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या दरम्यान 151 वाहनावर कारवाई करीत हे एक लाख 40 हजार रुपये दंडही आकारण्यात आला.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीमध्ये गुरूवारी मध्यरात्रीनंतर कोम्बिंग आणि ऑल आऊट ऑपरेशन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरूवारी रात्री ११ वाजता नाकाबंदी, कोम्बिंग आणि ऑल आऊट ऑपरेशनला सुरूवात झाली. शुक्रवारी पहाटे तीन पर्यंत ही कारवाई सुरू होती.
ऑपरेशन दरम्यान आर्म ॲक्ट, पाहिजे व फरारी आरोपी, अजामिनपात्र वॉरंट, हद्दपार आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत सर्व उपअधीक्षक, २५ पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांची पथके सहभागी झाली होती. ४२ पोलिस अधिकारी आणि २१९ अंमलदारांची नियुक्ती केली होती.