| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ जुलै २०२४
कतार येथील राजघराण्याला पैशांची मागणी करणारा एक मेसेज 20 जुलै रोजी मिळाला. हा मेसेज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने आला होता. प्रफुल्ल पटेल हे स्वतः उद्योगपती, राजकारणी आणि मोठे मंत्री आहेत. एक बडे नेते आहेत. त्यामुळे त्यांना पैशांची गरज का भासली असेल असा विचार करून त्या राजघराण्यातील कुटुंबाने प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला आणि एक मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. प्रफुल्ल पटेल यांनी या फसवणुकीची माहिती सायबर सेलला कळवली. त्यानंतर सायबर सेलने आयटी ॲक्ट 66 डी अंतर्गत एफआयआर नोंदवला.
महाराष्ट्रामध्ये सायबर गुन्ह्यांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. सायबर फसवणुकीची अशी दोन प्रकरणे महाराष्ट्रात उघडकीस आली आहेत. यातील एका प्रकरणात तब्बल 40 कोटींची चोरी झाली आहे. तर, दुसऱ्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाव समोर आले आहे. राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने सायबर घोटाळेबाजाने एक व्हीआयपी क्रमांक खरेदी केला. त्यानंतर आरोपीने प्रफुल्ल पटेल यांचा प्रोफाईल फोटो सोशल मीडिया हँडल व्हॉट्सॲपवर पोस्ट केला.
गुन्ह्याची ही पहिली पायरी गाठल्यानंतर आरोपीने कतारच्या राजघराण्याकडे पैशांची मागणी करणारा मेसेज केला. सायबर स्कॅमरला वाटले की कतारचे रॉयल फॅमिली आपल्या फसवणुकीला ओळखणार नाही. परंतु, तसे काही झाले नाही. त्या कुटुंबाला आरोपीच्या या मेसेजवर संशय आला. स्वतः उद्योगपती आणि नेते असलेले प्रफुल्ल पटेल हे पैशांची मागणी करतील याचा त्या कुटुंबालाच विश्वास बसत नव्हता. अखेर, त्या कुटुंबाने प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती पटेल यांना दिली.
प्रफुल्ल पटेल यांनी सायबर सेलकडे या प्रकरणाची तक्रार केली. सायबर सेलने या घटनेचा तपास तातडीने हाती घेतला. या प्रकरणी सायबर सेलने तपास सुरू करून आरोपी राहुल कांत याला अटक केली. आरोपी राहुल कांत हा मुंबईतील पॉश एरिया जुहू येथे राहत होता. सायबर सेलच्या तपासादरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे अशी माहिती सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिली.