yuva MAharashtra साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी लेखणीपुत्र कुलदीप देवकुळे !

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी लेखणीपुत्र कुलदीप देवकुळे !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जुलै २०२४
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याची बैठक आज सांगली येथे मोठया उत्साहात संपन्न झाली. बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य, गरीब-गरजू, बहुजन, मागासवर्गीयांच्या प्रबोधन परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून व्यापक जनचळवळ उभा करण्याचा निर्धार करण्यात आला. त्याचबरोबर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती आगळ्यावेगळ्या स्वरूपात आणि अण्णा भाऊंच्या कार्यकर्तृत्वाला शोभेल अशा पद्धतीने करण्याचे ठरले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक प्राध्यापक राम कांबळे सर होते. यावेळी जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष निवडीच्या बैठकीत मातंग समाजाचे अभ्यासक, महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारक समितीचे माजी जनसंपर्क अधिकारी साहित्यिक, पत्रकार लेखणीपुत्र कुलदीप देवकळे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर, उपाध्यक्षपदी वस्ताद लहुजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद रास्ते (कवठेमहांकाळ) यांची निवड करण्यात आली.


नूतन अध्यक्ष कुलदीप देवकुळे म्हणाले की, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहेतच, त्याचबरोबर, महाराष्ट्राचा स्वाभिमान-अभिमान आहेत. त्यांची जयंती सर्वसमावेशक आणि जिल्ह्याच्या लौकिकात भर पडेल अशीच होईल,हा विश्वास दिला.

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक दलित मित्र अशोकराव पवार, प्राध्यापक लक्ष्मण मोरे सर, संदीप (तात्या) ठोंबरे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आकाश तिवडे (मेजर), भीमराव बेंगलोरे, निलेश मोहिते, गणेश खिलारे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी अण्णाभाऊंच्या मानवतावादी,समतावादी विचारांचा जागर करण्याचा निश्चय केला. 
या बैठकीस विक्रम मोहिते, विजय चांदणे, नागनाथ माने, सुशांत माने, आबासाहेब सुहासे, राम मोरे, मिलिंद कांबळे यांच्यासह सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमंकाळ, मिरज, खानापूर, आटपाडी, पलूस, तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार संतोष सदामते यांनी मांडले.